जालन्यात राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला:टोपे -लोणीकर वाद रंगला 

जालना,२ डिसेंबर/ प्रतिनिधी :-माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर आज अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली टोपे यांची गाडी पार्क केलेली असताना या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात गाडीची समोरची काच फुटली. गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली.

हल्ल्यावेळी टोपे यांचा चालक गाडीमध्येच उपस्थित होता. शिवाय चार ते पाच जणांच्या टोळक्याने गाडीवर दगडफेक केल्याचे त्याने सांगितले. हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.माजी मंंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचं कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

राजेश टोपे यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. राजेश टोपे म्हणाले, “लोणीकरांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेच्या आवारात आणि माझ्या कारवर दगडफेक केली आहे. यात कारची समोरील काच फुटली आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह  आहे.”

भाजपा नेते बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक झाल्याचं म्हटलं जातंय. याबाबत बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच राजेश टोपेंनी आमच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न केला, असंही ते म्हणाले. 

बबनराव लोणीकर म्हणाले की, जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सुरू होती. संचालक निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची चर्चा सुरू होती. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर, अजित पवार गटाचे अरविंद चव्हाण, राष्ट्रवादीचे राजेश टोपे तेथे उपस्थित होते. पाच तास चर्चा झाली. चर्चा बिनविरोध झाली. पुढे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी माझ्या बंगल्यावर राजेश टोपे पाच – सहा तास बसले.

“भाजपा, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट या तीन पक्षांत ही बैठक झाली. परतूर, मंठा या दोन तालुक्याला या बँकेचं उपाध्यक्षपद द्यायचं, असं ठरलं होतं. परंतु, ऐनवेळेला राजेश टोपेंनी पलटी मारली, विश्वासघात केला. त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. आमच्या भाजपा कार्यकर्त्यांची तक्रार आहे की, त्यांनी आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. म्हणून या गोष्टी घडल्या”, असा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

“आता जिल्हा शांत राहिला पाहिजे. त्यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या असतील तर दुरुस्त करून देऊ. परंतु, जिल्ह्यांत भाजपा आणि राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण करायचा असेल तर आम्ही केव्हाही रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहे” , असा इशाराही त्यांनी दिला.