शिंदे समिती बरखास्त करा! छगन भुजबळ यांची मागणी; जातनिहाय जनगणनेचा आग्रह

 छगन भुजबळांकडून विषय भरकटवण्याचं काम, मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर

हिंगोली : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ठरविण्यासाठी नेमण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केली. गेल्या दोन महिन्यांत देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणीही त्यांनी ओबीसी एल्गार परिषदेत केली.

हिंगोली येथील रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या सभेत भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका मांडली. ‘‘मी काही बोललो की, महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना वाटते, दोन समाजात तेढ निर्माण करतो. मात्र, त्यांच्या १५ सभा झाल्यावर, आमची एकच सभा होत आहे. आम्हाला रोज शिव्या दिल्या जात आहेत. मी आणि माझे कुटुंब दोन महिने या शिव्या वाचतो आणि ऐकतोय. आम्ही कसे जगायचे? ’’ असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

‘‘भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे जातनिहाय जनगणेनला अनुकूल आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही या मागणीला पाठिंबा आहे. जातनिहाय जनगणनेनंतरच अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींची शक्ती किती आहे, हे कळेल. बिहार जनगणना करू शकते, मग महाराष्ट्र का करू शकत नाही’’, असा प्रश्नही भुजबळ यांनी केला. सर्वांची जनगणना करा, सर्वांचे सर्वेक्षण करा आणि मगच मागासलेपण ठरवा, असेही भुजबळ म्हणाले. या वेळी प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, बबनराव तायवाडे, खासदार रामदास तडस, लक्ष्मण गायकवाड यांचीही भाषणे झाली.

गावबंदीस कायद्याने मनाई’

गावबंदीचे फलक लावल्यास एक महिन्याची शिक्षा होऊ शकते, असा कायदा आहे. त्यामुळे गावबंदी करणाऱ्यांना एक महिना तुरुंगात कधी पाठविणार, असा सवाल भुजबळ यांनी केला. आमचा मराठ्यांना नव्हे, तर झुंडशाहीला विरोध असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवारांची पाठ

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी सभेकडे पाठ फिरवली. ते तेलंगणमध्ये प्रचारसभेला गेल्याचे सांगण्यात आले.

भुजबळ न्यायालयापेक्षा मोठे झाले आहेत का? भुजबळ यांची दंगल सभा- मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हिंगोलीतील ओबीसी एल्गार महामेळाव्यात केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मराठ्यांनी तुमच्यासाठी किती जोडण्या केल्या, मराठ्यांनी तुम्हाला प्रतिष्ठेच्या पदावर नेऊन नेलं होतं, ते तुम्ही तोडलं होतं, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. क्षीरसागर माणुसकीच्या भावनेतून भेटायला आले होते. अंतरवाली सराटीत महिलांवर हल्ला झाला तेव्हा भुजबळ भेटायला आले का?, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

बीडमधील घटनेचं आम्ही समर्थन केलेलं नाही, तुम्ही सहानुभूती घेण्यासाठी तिथं गेला होता, असं देखील जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे, असंही जरांगे म्हणाले. लोकांनी हक्कांनी गावबंदी केली आहे, त्यांना अधिकारपदाचा दुरुपयोग करायचा आहे असं देखील जरांगे म्हणाले.

रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर नव्हे तर राज्यातील विविध लोकं भेटण्यात आले होते. छगन भुजबळ यांनी अनेक पक्ष मोडले आहेत आतापर्यंत असंही जरांगे म्हणाले. आमच्या लोकांनी मार खाल्ला, महिलांनी गोळ्या खाल्ल्या, कोणताही संबंध कशाशी जोडू नका, असं जरांगेंनी म्हटलं. राहुल बेदरे याच्या सोबत माझेही फोटो आहेत. महाराष्ट्रात कोणाचेही कोणासोबत फोटो असू शकतात, असं जरांगेंनी म्हटलं.