“तुमच्या एकाही महाविद्यालयाला सावित्रीबाईंचं नाव का नाही?” मनोज जरांगे पाटील यांचा भुजबळांना थेट प्रश्न

नाशिक ,२२ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमधल्या सभेत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. छगन भुजबळ यांना जेव्हा विचारण्यात आलं की मनोज जरांगे पाटील हे नाशिकमध्ये सभा घेणार आहेत तेव्हा ते म्हणाले की त्यांचं स्वागत आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हटलं होतं. अशात आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचं नाव घेता टीका केली. तू कुठे भाजी विकायचा, कुणाचे बंगले बळकवले?, मुंबईत तुम्ही काय केलं?, कोणत्या चित्रपटात नाटकात काम केलं? हे मला माहीत आहे. २०१६ मधल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची आठवणही जरांगे पाटील यांनी केली. महाराष्ट्र सदनात घोटाळा केला म्हणून तुरुंगात जावं लागलं, असंही ते म्हणाले.

आता व्यक्ती म्हणूनही आमचा विरोध

आधी व्यक्ती म्हणून त्यांचा विरोध करत नव्हतो त्यांच्या भूमिकेला विरोध होता. आता व्यक्ती म्हणूनही त्यांचा विरोध आम्ही करतो आहोत. कारण मराठा-ओबीसी वाद होतील अशी वक्तव्य तो माणूस करतो आहे. कायदा सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही दंगली होतील यासाठीची वक्तव्यं करु लागला. ३०-३५ वर्षे तुम्ही सत्ता भोगली आहे. तरीही त्यादिवशी तुमच्या पोटातली गटारगंगा तु्म्ही त्या दिवशी दाखवलीत असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठे जातीय दंगली या राज्यात होऊ देणार नाहीत हे लक्षात ठेवा.

ओबीसींना किती समस्या आहेत माहीत आहे का? ज्यांना फायदा मिळाला त्यांना मिळाला बाकीच्यांचं हा ओरबाडून खातोय. तरीही म्हणतो मला कमी पडतं आहे. आपण दंगली कराव्यात हा यांचा उद्देश आहे. पण तू कितीही विरोध कर आम्ही आरक्षण मिळवणारच. म्हाताऱ्या माणसाने आता बोलू नये, जास्त बोलू नये, पाणी कमी पडू शकते. आता नाही, आरक्षण मिळू द्या मग बघतो. यांचं आपल्याला सगळं माहिती आहे आड येऊ नको. तुमच्या एकाही महाविद्यालयाला सावित्रीबाईंचे नाव का दिलं नाही? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

राज्यातील मराठा समाजाला एक करण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यभरात दौरा सुरु केला आहे. माझ्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी मराठ्यांसाठी लढणार. जे लोक आरक्षणात खोडा घालतील त्याचा योग्य कार्यक्रम टप्प्यात येताच करेल, अशी ग्वाही मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी झालेल्या सभेत दिली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात साडेदहाला मनोज जरांगे-पाटील यांची सभा झाली आहे. त्या वेळी ते बोलत होते, की माझी तब्येत ठीक नसतानाही मी २४ तास मराठा समाज बांधवांच्या भेटी घेऊन आपली ऐकी राखण्यासाठी आवाहन करीत आहे. ३२ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या असून, आता एक कोटी मराठा समाज बांधवांना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे आता मराठा आरक्षण आपल्या जवळ आलं आहे.

त्यामुळे मराठ्यांची वज्रमूठ एक ठेवा, असं आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केल आहे. आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काहींनी कशाकशात लाभ उठवले, हे मी सांगण्याची गरज नाही. त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे असून वेळ येताच कार्यक्रम निश्चित करण्यात येईल, अशी मी ग्वाही मी देतो. सध्या फक्त आरक्षण हाच विषय असल्याने उद्याच्या सभेत मी सगळं सविस्तर सांगेन, असंही ते म्हणाले.

माझ्या सभेसाठी आठची वेळ देण्यात आली होती. तोपर्यंत खेड्यापाड्यांतून स्री-पुरुष हजर होते. जरांगे-पाटील स्टेजवर येताना त्या भागात प्रचंड रेटारेटी झाल्याने आयोजकांना त्यांनी खडेबोल सुनावले आहे. स्टेजवर जरांगे-पाटलांशिवाय एकाही व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी लोकांनी मनाई केली आहे. उशीर झाल्याने कार्यक्रम जरांगे पाटलांच्या भाषणाने लगेच सुरू झाला.