राहुल गांधींच्या सावरकरांवरील टीकेनंतर मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

राज्यभरात सावरकर यांच्या कार्याची महती सांगणारी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार – मुख्यमंत्री

मुंबई,२७ मार्च  /प्रतिनिधी :-आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काल मालेगाव येथे राहुल गांधींवर उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका हे, ‘उशीरा सुचलेले शहाणपण आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याचीही घोषणा केली.

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जशी मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडात मारली, तशी मारण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या बाजूने काही प्रमाणात सहानुभूतीचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची देखील महाविकास आघाडीत कोंडी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. 

एकनाथ शिंदे म्हणाले, ”राहुल गांधी वारंवार म्हणतात, मी सावरकर नाही, गांधी आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. तेवढा त्याग, देशाबद्दल प्रेम असायला पाहिजे. तुम्ही काय सावरकर होणार? तुम्ही परदेशात जाऊन देशाची निंदा करता. आपल्या देशात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे समजू शकतो, पण परदेशात जाऊन निंदा करणे हा देशद्रोह आहे,’ अशी जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

‘‘शिवसेना-भाजप युती प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा मतदारसंघात राहुल गांधींचा निषेध करेल व सावरकर गौरव यात्रा काढेल. सावरकरांचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करू, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे असते तर सावरकरांचा अपमान सहन केला असता का?

उद्धव ठाकरे यांचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, ”हिंदुत्व-हिंदुत्व म्हणणाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात एकही शब्द काढला नाही. राहुल गांधींची खासदारकी कायद्याने गेली, त्याविरोधात यांनी काळ्या फिती बांधून निषेध केला. आज सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणता. तुम्ही राहुल गांधींना जाब विचारला पाहिजे. कालचे वक्तव्य म्हणजे, उशीराने सुचलेले शहानपण आहे, असं म्हणतं त्यांनी, बाळासाहेब असते तर सावरकरांचा अपमान सहन केला असता का?”, असा सवालही उपस्थित केला.