कार्तिकी यात्रेसाठी सात लाख भाविक पंढरपूरला दाखल

फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा

पंढरपूर ,२२ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. कार्तिकीला येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराला पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांच्याकडून ५ टन फुलांच्या सजावटीचे काम केले आहे. सध्या दर्शन रांग गोपाळपूर येथील १० पत्राशेडमध्ये असून, भाविकांना दर्शनाला बारा तासांचा अवधी लागत आहे. मात्र, असे असले तरीही विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांमधील उत्साह कणभरही कमी होताना दिसत नाही.

आज कार्तिकी एकादशीअसून, यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसयांच्या हस्ते झाली आहे. तर, यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसेच, अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यामुळे, या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवसीय आधीच म्हणजे बुधवारीच पंढरपूरात दाखल झाले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.

मानाचे वारकरी : माळेदुमाला (ता.दिंडोरी, जि.नाशिक) येथील शेतकरी बबन विठोबा घुगे, वत्सला बबन घुगे. मागील 15 वर्षापासून ते वारी करतात.