मराठा आरक्षणासाठी राज्यात पुन्हा एकदा आंदोलन:मनोज जरांगे-पाटील

छत्रपती संभाजीनगर ,५ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-मराठा आरक्षणासाठी राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाला गती देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले असले तरी सरकारवर त्यांचा विश्वास नाही. आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण लवकरच आता राज्याचा दौरा सुरू करणार आहोत. हा दौरा विदर्भातून सुरू होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाबाबत त्यांनी सांगितले की, राज्य सरकारची मदार  क्युरिटीव पेटिशनवर आहे.  मात्र,  त्यावर आम्हाला फारसा  विश्वास नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितले. तो पूर्ण उपचार नसून ती फक्त मलमपट्टी असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. आम्हाला सरसकट ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे हीच आमची मागणी आहे आणि याचाच विचार राज्य सरकारने करावा असेच जरांगे यांनी म्हटले.

आमचा जरी सरकारवर विश्वास असला तरी आम्ही दुसरी बाजू भक्कम करत असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. आम्हाला दगा फटका होण्याचीही भीती आहे. त्यामुळे आंदोलनाची तयारी ही आमची सुरू आहे आणि येत्या एक तारखेपासून गावागावात साखळी उपोषण सुरू होईल. ज्या गावात आधीपासून आहे तिथे राहीलच आणि नव्याने गावांचा समावेश होईल असेही जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांना उपचारासाठी शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात गुरुवारी रात्री दाखल करण्यात आले.सध्या त्यांच्या रक्तातील साखर आणि पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांचे वजन १० ते १२ किलोंनी कमी झाले आहे. याशिवाय मूत्रपिंड आणि यकृतावरही अत्यल्प सूज आहे. अजून दहा दिवस त्यांना रुग्णालयातच राहावे लागेल. त्यांना सध्या पातळ पदार्थ, फळांचा रस, नारळ पाणी देण्यात येत आहे. सोमवारपासून (ता. ६) त्यांना जेवण देण्यात येईल, अशी माहिती डॉ. अभिमन्यू माखणे यांनी दिली