छत्रपती संभाजीनगर: मतदारसंख्या २९ लक्ष ४५ हजार २११

नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

३१ हजार ९८३ इतकी नवीन मतदार नोंदणी

छत्रपती संभाजीनगर ,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. मतदार यादी प्रकाशनानंतर जिल्हाधिकारी पत्रकारांशी संवाद साधत होते.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त पत्रकारांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी उपस्थित होते.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबवला जाणार आहे. दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेले नागरिक या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच २०२४ च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या ०१ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणा-या तरुण-तरुणींनाही सदर कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल; मात्र त्या अर्जांवरील प्रक्रिया सदर तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. २०२४ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलांमध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. आठ भरावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते, त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबंधी हरकत सुद्धा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १८ व १९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणी शिबिरासाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (एसएसआरएलएम) या शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी कार्य करणा-या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत.

तृतीयपंथी, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी २ व ३ डिसेंबर रोजी शिबिरे

तृतीयपंथी व्यक्ती, शरीरव्यवसाय करणा-या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी ०२ व ०३ डिसेंबर या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सदर समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे, त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकणार आहेत.

१ ते ७ नोव्हेंबर विशेष ग्रामसभा

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने ०१ ते ०७ नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

दि. ०५ जानेवारी २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारसंख्या २९ लक्ष १३ हजार २२८ इतकी होती. ही मतदारसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७१.४७ टक्के इतकी होती. त्यानंतर झालेल्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आता २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील एकूण मतदारसंख्या २९ लक्ष ४५ हजार २११ एवढी आहे आणि ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७२.२६ इतकी आहे. यामध्ये ३१ हजार ९८३ इतकी नवीन मतदार नोंदणी आहे, तर ६९ हजार ५९० एवढ्या मतदारांची नावे वगळली गेली आहेत. वगळण्यात आलेली ही नावे दुबार, मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित या मतदारांची होती.

तसेच २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारसंख्या १५ लक्ष ३४ हजार ७०० इतकी होती. तर २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या १५लक्ष ४९ हजार ३३५ एवढी आहे. तर स्त्री मतदारांची जानेवारी २०२३ मधील संख्या तेरा १३ लक्ष ७८हजार ४३७ इतकी तर ऑक्टोबर २०२३ मधील संख्या १३ लक्ष ९५ हजार ७७५ एवढी आहे. जानेवारी २०२३ मधील यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ८९८ स्त्रिया होत्या, तर ऑक्टोबरच्या यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९०१ स्त्रिया आहेत. तृतीयपंथी समुदायाची जानेवारी २०२३ मधील संख्या ९१ होती, तर ऑक्टोबर २०२३ मध्ये एकशे एक १०१ इतकी आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्‍या लोकसंख्येत १८-१९ वयोगटाची टक्केवारी ३.२३ (१,३१,९९९) इतकी आहे, पण ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त ०.८७ (३५,५५२) एवढी आहे. तर २० – २९ या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी १७.२६ (७,२३,९९३) इतकी आहे, पण ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त १५.२० (६,१९,५७२) एवढी आहे. युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय’ पुरस्काराचे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकी आधीचा हा अखेरचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम असल्याने, राज्यात या कार्यक्रमाची व्यापक प्रचार प्रसिद्धी करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), मोटार वाहन विभाग (RTO), बेस्ट परिवहन सेवा (बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र – मुंबई शहर आणि उपनगर)  वीज पुरवठा कंपन्या, मध्य आणि पश्चिम रेल्वे व्यवस्थापन तसेच महानगर गॅस या यंत्रणांचेही सहकार्य घेतले जात आहे. याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वर नमूद प्रत्येक यंत्रणांच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या सहकार्याचे स्वरुप निश्चित केले आहे. नमूद यंत्रणांपैकी आपल्या जिल्ह्यात ज्या ज्या यंत्रणांची कार्यालये आहेत, त्या त्या ठिकाणीदेखील त्या यंत्रणेच्या भागिदारीशी संबंधीत साहित्य प्रकाशीत करुन व्‍यापक प्रचार व प्रसिध्‍दी करण्‍यात येणार आहे, अशीही माहिती देण्यात आली.