परभणी जिल्हा प्रशासनाला नामांकित “स्कॉच” संस्थेचे प्रतिष्ठीत “ऑर्डर ऑफ मेरीट” प्रमाणपत्र

परभणी,६जुलै /प्रतिनिधी :-राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचे मानले जाणार्‍या सन २०२१ वर्षाच्या ७४व्या स्कॉच अवार्डची घोषणा नुकतीच करण्यात आली. परभणी जिल्हा प्रशासनातर्फे सादर केलेल्या “इफेक्टीव यूज ऑफ इनफोर्मेशन टेक्नोलॉजी ड्युरींग कोव्हीड-१९” अर्थात “कोव्हीड-१९ कालवधीत माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर” या उपक्रमाला उपविजेत्यापर्यंत मजल गाठली असून “स्कॉच” संस्थेचे प्रतिष्ठीत “ऑर्डर ऑफ मेरीट” प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. 

Displaying IMG-20210706-WA0006.jpg

२०२१च्या पुरस्कारासाठी टेक्नॉलॉजी, पावर, गव्हर्नन्स, स्कील, रीसपॉन्स टू कोव्हीड अशा  गटात राष्ट्रीय स्तरावर  नामांकणे मागविण्यात आली होती. कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील प्रकल्पांची यशस्वीरित्या अंमंलबजावणी करण्यासोबतच मा. जिल्हाधिकारी श्री दिपक मुगळीकर यांनी परभणी जिल्ह्यात अनेक नाविन्यपुर्ण उपक्रमाद्वारे माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केला. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री सुनिल पोटेकर व त्यांच्या संपूर्ण टीमने संपूर्ण तांत्रिक सहकार्य दिले. या कालावधीत राबवीलेल्या प्रकल्पांच्या आधारे मार्च २०२१ महीन्यात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्कॉच संस्थेस “रीस्पॉन्स टू  कोव्हीड” या गटात नामांकन दाखल करण्यात आले होते. 
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सहाय्याने परभणी जिल्ह्यात कोव्हीड-१९ अंतर्गत अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात जिल्हाप्रशासनास यश आले. मागील वर्षी लॉकडाऊन काळात कापूस खरेदीसाठी शेतकर्‍यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून ऑनलाईन प्रणालीचा वापर करून सुमारे पन्नास हजार शेतकऱ्यांची गर्दी कमी करण्यात जिल्हा प्रशासनास यश आले. याच धर्तीवर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली वापरण्यात आली. हॉस्पिटल इन्फॉरमेशन कलेक्शन सिस्टीम (एचआयसीएस) प्रणालीद्वारे रुग्णालयांमार्फत दैनंदिन बाह्य रुग्ण आणि आंतररुग्ण यांची माहिती संगणक प्रणालीत घेऊन कोणत्याही वेळी जिल्ह्यात कोविड रुग्णांसाठी किती खाटा उपलब्ध आहेत ही माहिती नागरीकांना  प्रदर्शित करण्यात आली. लॉकडाऊन कालावधीत नागरीकांना घरबसल्या किराणा माल मिळण्याच्या उद्देशाने “पीबीएन शॉप” हे मोबाईल ऍप विकसित करून त्यात भाजी-पाला खरेदीचीपण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याशिवाय दिव्यांग व्यतींचा डाटाबेस आणि  रेमेडीसीवीअर इंजेक्शनचा वाटप नियमित करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा प्रभावीपणे वापर करण्यात आली.

————————————————————————

“माहिती व तंत्रज्ञानाचा लोकाभिमुख योजनांसाठी प्रभावीपणे कसा वापर करता येईल या दृष्टीने जिल्ह्यात अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले. “स्कॉच” संस्थेचे प्रतिष्ठीत याची दखल घेऊन अवार्ड ऑफ मेरीट प्रमाणपत्र प्रदान करणे ही  निश्चीतच आनंदाची गोष्ट आहे. या करीता स्कॉच संस्थेचे धन्यवाद आणि आमच्या एनआयसी टीमचे अभिनंदन “

-दिपक मुगळीकर, जिल्हाधिकारी,परभणी

——————————————————–

“अंतिमफेरीत आमची स्पर्धा अत्यंत बलाढ्य प्रकल्पांसोबत होती. जिल्हाधिकारी महोदयांच्या कल्पकतेने साकारलेल्या या प्रकल्पातील  नाविण्यापूर्णतेमुळे आणि त्यांची उपयुक्तता सिद्ध झाल्यामुळे आम्ही उपविजेत्या फेरीपर्यंत जावू शकलो. या सन्मानाचे संपूर्ण श्रेय जिल्हाधिकारी यांचे यांचे आहे.”

– सुनिल पोटेकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, एनआयसी,परभणी

————————————————————————————

राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ समितीच्या मुल्यमापनाच्या आधारे प्रथम फेरीत उत्तीर्ण होऊन परभणी जिल्ह्याची दुसर्‍या फेरीसाठी निवड करण्यात आली. संस्थेच्या पुरस्कार निवड समीतीसमोर दिनांक२४ एप्रील २०२१रोजी एक  सादरीकरण करण्यात आले. त्या सादरीकरणानंतर परभणी जिल्ह्याचा उपविजेता म्हणुन निवड होऊन दिनांक ३जुलै २०२१ रोजी झालेल्या अंतिम फेरीसाठी परभणी जिल्हा पात्र ठरला. परभणी जिल्ह्याचे सादरीकरण संस्थेच्या वेबसाईटवर प्रदर्शन स्वरूपात प्रदर्शित करण्यात आले. अंतिम फेरीत पुरस्कार समितीने दीलेल्या गुणांकनासोबत  दर्शकांनी कळवलेल्या मताधिक्याचा समावेष करण्यात आला. अंतिम गुणाकंनानुसार विजेत्यांना सुवर्ण आणि रौप्य पुरस्कार देण्यात आले. “रीस्पॉन्स टू  कोव्हीड” या गटात वारानसी स्मार्ट सीटी प्रकल्पास सुवर्ण तर सॅम्पल मॅनेजमेंट सिस्टीम – हिमाचल प्रदेश यांना रौप्य पुरस्कार देण्यात आले.