बेरोजगार तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगारविषयक मार्गदर्शनासाठी आता ऑनलाईन समुपदेशन

कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. १ – राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारविषयक तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध रोजगारविषयक अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाईन समुपदेशन (कौन्सिलिंग) सत्र आयोजित करण्यात येत आहेत. प्रायोगिक तत्वावर दि. २४ व २५ जून रोजी उस्मानाबाद व सातारा येथे ऑनलाईन कौन्सिलिंग सत्राचे आयोजन करण्यात आले. यास तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशा सत्रांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या सत्रांमध्ये तरुणांना विविध क्षेत्रातील मान्यवर व्याख्यात्यांचे मार्गदर्शन होईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन कौन्सिलिंग सत्रांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन कौन्सिलिंगचे वार्षिक कॅलेंडरही तयार करण्यात आले आहे. ऑनलाइन कौन्सिलिंग सत्रांमध्ये विविध क्षेत्रांमधील पुढील उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधी, जॉब रोलनिहाय रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराच्या संधी, खाजगी क्षेत्रामध्ये तसेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी याबाबतचे मार्गदर्शन तज्ञ व्यक्तींमार्फत देण्यात येणार आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

एरोस्पेस व एव्हीएशन क्षेत्र, कृषी क्षेत्र, अपॅरेलमेड – अप आणि होम फर्निशिंग सेक्टर, ऑटोमोटिव्ह क्षेत्र, ब्युटी अँड वेलनेस सेक्टर, बीएफएसआय सेक्टर, कॅपिटल गुड्स सेक्टर, बांधकाम क्षेत्र, डोमॅस्टीक वर्कर (घरेलू कामगार) क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र, खाद्य उद्योग क्षेत्र, फर्निचर आणि फिटिंग्ज क्षेत्र, जेम्स व ज्वेलरी क्षेत्र, हँडिक्राफ्ट्स आणि कार्पेट सेक्टर, हेल्थ केअर सेक्टर, हाइड्रोकार्बन सेक्टर, भारतीय लोह आणि स्टील क्षेत्र, इंडियन प्लंबिंग सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर उपकरण क्षेत्र, मार्ग स्वयंचलन पाळत ठेवणे आणि संप्रेषण क्षेत्र, इन्स्ट्रुमेंटेशन ऑटोमेशन सर्विलन्स ॲण्ड कमुनिकेशन क्षेत्र, आयटी –आयटीइएस क्षेत्र, लेदर सेक्टर, जीवन विज्ञानक्षेत्र, लॉजिस्टिक क्षेत्र, व्यवस्थापन व उद्योजकता व व्यावसायिक क्षेत्र, मीडिया आणि करमणूक क्षेत्र, पेन्ट्स आणि कोटिंग्ज क्षेत्र, पॉवर सेक्टर, रिटेलर्स क्षेत्र, रबर सेक्टर, ग्रीन जॉब्स सेक्टर, खाण क्षेत्र, अपंग व्यक्ती क्षेत्र, स्पोर्टस्, शारीरिक शिक्षण, स्वास्थ्य आणि विश्रांती क्षेत्र, स्ट्रॅटेजिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, दूरसंचार क्षेत्र, सूक्ष्म क्षेत्र, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्र आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

कौशल्य विकास विभागाने उमेदवार व उद्योग यांच्या सोयीकरता www.mahaswayam.gov.in ही वेबसाईट सुरु केली आहे. वेबसाईटवरील सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच याबाबत काही अडचण असल्यास जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री श्री. नवाब मलिक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.