खासदार संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; काय आहेत आरोप?

मेधा सोम्मयांच्या मानहानी प्रकरणी कोर्टाचे आदेश; २४ जानेवारीला पुढील सुनावणी

मुंबई ,६ जानेवारी  / प्रतिनिधी :-  शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईच्या शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. यानंतर लगेच संजय राऊत यांनी शिवडी न्यायालयात हजेरी लावली. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेला अजामीनपात्र वॉरंट रद्द करून घेतला. मानहानीचा सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने तक्रारदाराच्या विनंतीवरून कारवाई करण्यात आली होती.

मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात संजय राऊत हे सुनावणीदरम्यान सतत गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्याची मागणी करण्यात आली होती. ही माहिती देताना किरीट सोमय्या म्हणाले की, आज (शुक्रवार) न्यायालयाने मेधा सोमय्या यांचे सुमारे तासभर जबाब नोंदवले. त्यानंतर न्यायालयाने राऊतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २४ जानेवारीला होणार आहे.

मेधा सोमय्या यांनी आरोप केला आहे की, संजय राऊत यांनी आपल्या विरोधात खोटी विधाने केली आणि १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात आपला सहभाग असल्याचा आरोप केला. यामुळे माझी बदनामी झाली आणि प्रतिमा मलिन झाली. त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात (मुलुंड) राऊत यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. शौचालय घोटाळ्याचा आरोप करून संजय राऊत यांनी आपला छळ आणि बदनामी केल्याचा आरोप मेधा सोमय्या यांनी केला आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर टॉयलेट घोटाळ्यावरुन वेगवेगळे आरोप केले होते.

संजय राऊत यांनी काय दावा केला होता?

मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात तब्बल १०० कोटींचा शौचालय घोटाळा केला असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. किरीट सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिले देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणे दाखवून हा घोटाळा केला. एकूण १०० कोटींचा हा घोटाळा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने हा घोटाळा केल्याचा दावा त्यांनी केला होता.