सरकारला उद्यापर्यंत मुदत; जरांगे-पाटील यांचा बुधवारपासून उपोषणाचा इशारा

‘या’ नंतर होणारं आंदोलन सरकारला पेलवणारं नाही आणि परवडणारही नाही ; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

जालना ,२२ऑक्टोबर /प्रतिनिधी :- दोन दिवसांत (२४ ऑक्टोबर) कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसीमध्ये करावा, अन्यथा बुधवार, दि. २५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी दिला. येथील आंतरावली सराटी गावामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्री, खासदार, आमदार यांना राज्यभर गावबंदी करण्यात येईल, असेही जरांगे म्हणाले. बुधवारी उपोषणास बसताना आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जरांगे म्हणाले, की २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक जिल्ह्यातील ‘सर्कल’ च्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात येईल. २८ ऑक्टोबरपासून या उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात केले जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक गावात ‘मेणबत्ती फेरी’ काढण्यात येईल. 

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरकक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीअनेक आंदोलन केली उपोषण देखील केलं. पण अजूनही सरकारनं ठाम असा निर्णय घेतला नाही. जरांगे पाटील यांनी सरकारला एक 40 दिवसांचा वेळ दिला आहे त्यानुसार आता येणाऱ्या 24 तारखेपर्यंत सरकारकडे वेळ आहे. त्यानंतरचं आंदोलन होईल ते सरकारला झेपणारही नाही आणि पेलणारही नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसंच, मराठा समाजाला आरक्षण देताना कोणी आडवा आला तर त्याला टप्प्यात घेतलाचं म्हणून समजा’, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते शनिवारी कर्जत येथे सकल मराठा समाज आयोजित महासभेत बोलले होते.

आरक्षण मिळवण्यासाठी आपली फक्त एकजूट वाढवा आता आरक्षण घेतल्याशिवाय कोणीही माघार घ्यायची नाही, मी माघार अजिबात घेणार नाही, तुम्ही पण मागे हटायच नाही. पण आपल्याला हे आरक्षण शांतता पाळून घ्यायच आहे, त्यासाठी कोणी आपला जीव देऊ नका, आपल कुटुंब उघड्यावर टाकू नका, असं देखील यावेळी मनोज जरांगे यांनी समाज बांधवांना सांगितलं. मराठा समाजास आरक्षण देताना कोणी आडवा आला तर त्याला टप्प्यात घेतलाच म्हणून समजा, याच जातीने अनेक राजकीय नेत्यांना मोठं केलं, मात्र आता आज तेच नेते आमच्या विरोधात उभे राहिले आहेत, अशी खंत मनोज जरांगे यांनी यावेळी बोलून दाखवली.