नागपूर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.मुरहरी केळे

छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३० वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित केले जात आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मुरहरी केळे यांची निवड सर्वानुमते केली असल्याचे या संमेलनाचे निमंत्रक शरद गोरे यांनी कळविले आहे.

सदर संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत डॉ.मुधोजीराजे भोसले असून त्या संमेलनाचे उद्घाटन नाना पटोले करणार आहेत. द.मा. मिरासदार, नारायण सुर्वे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, शिवाजी सावंत, सुरेश भट, केशव मेश्राम, विश्वास पाटील, गंगाधर पानतावणे, आ.ह. साळुंखे, नरेंद्र जाधव, भास्कर चंदनशिव, श्रीपाल सबनीस यांसारख्या नामवंत साहित्यिकांनी सदर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यापूर्वी भूषवल्याचे निमंत्रकांनी कळवले आहे. सर्व साहित्यप्रेमींनी त्या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

‍संमेलनाध्यक्ष डॉ.केळे हे मूळचे केळेवाडी (‍जि.धाराशिव) येथील रहिवासी असून, गेल्या तीस वर्षांपासून ‍ते साहित्य लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेले ‘जगी ऐसा बाप व्हावा’ हे वडिलांचे चरित्र व ‘नानी’ हे आईचे चरित्र प्रसिद्ध आहे. यासह त्यांची विविध विषयांवरील दहाहून अधिक पुस्तके मराठी व इंग्रजी भाषेत प्रका‍शित झालेली असून, ‍अनेक दिवाळी अंक, मासिके, वृत्तपत्रांतही त्यांनी विपुल लेखन केलेले आहे.

गेल्या 35 वर्षांपासून विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत डॉ.केळे यांनी यापूर्वी त्रिपुरा राज्य ‍विद्युत महामंडळाचे अध्यक्ष, मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक, महावितरणचे संचालक म्हणून काम केलेले आहे. सध्या ते महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत. साहित्यिक, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शासनासह विविध संस्थांच्या वतीने 33 हून अधिक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.