मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेल्या समितीचा ११ व  १२ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हयाचा दौरा

नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज 2 ते 4 या वेळेत उपलब्ध करून देण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-  मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे 11 व 12 ऑक्टोबर  २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हयाचा दौरा करणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

या दौऱ्या दरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत. पुरावे दुपारी 2 ते 4 या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे

समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालय येथे दुपारी 2 ते 4 या वेळेत नागरिकांकडून पुरावे स्विकारले जाणार आहेत. पुरावा शक्यतो साक्षांकित असावा.

जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक घेण्यात येणार आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 2 ते 4 या वेळेत नागरिकांकडून पुरावे स्विकारले जाणार आहेत, असे  विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.