काँग्रेस नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र ; सक्षम पक्षनेतृत्त्वाची मागणी

राहुल गांधींनी नकार दिल्यास कोण होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष?

नवी दिल्ली : राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक सोमवारी होणार आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. यानंतरही पक्षात फारसे बदल झालेले नाहीत. पक्ष अतिशय मोजक्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यातही पक्षांतर्गत नाराजीचं सत्र सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. पक्षाला मोठ्या बदलांची गरज असल्याचे मत त्यांनी पत्रातून व्यक्त केले आहे.या बैठकीत सोनिया अध्यक्षपद सोडू शकतात, असं बोललं जातंय. २०१९ साली लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता. यानंतर वर्षभरापेक्षा जास्त काळ सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत. 

अध्यक्ष म्हणून आता मला कायम राहायचं नाही, त्यामुळे नवा अध्यक्ष शोधा, असं सोनिया गांधींनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्षपद सोडलं, तर पुढे पक्षाचं नेतृत्व कोण करणार? याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात पक्षातील अस्थिरता आणि फुटीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पक्षाला प्रभावी आत्मपरिक्षणाची आवश्यकता आहे. पक्षाला पूर्णवेळ कृतीशील आणि प्रभावी नेतृत्वाची गरज निर्माण झाली असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हंटले आहे की, काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचे काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवे. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असे या २३ नेत्यांनी पत्रात म्हटले आहे.

यानंतर आता काँग्रेसमधल्या घडामोडींना वेग आला आहे. गांधी कुटुंबाला अशाप्रकारे आव्हान देणे अशाप्रकारे चुकीचं असल्याचं संजय निरुपम आणि कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. असे मुद्दे उपस्थित करण्याची ही योग्य वेळ नसल्याचं अमरिंदर सिंग म्हणाले. काँग्रेसमधले काही जण राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्ष व्हावं, अशी मागणी करत आहेत. तर काही कार्यकर्ते प्रियंका गांधींनी अध्यक्ष व्हावं, अशी मागणी करत आहेत. तर गांधी घराणं सोडून कोणीतरी पक्षाचं अध्यक्ष व्हावं, असं प्रियंका गांधी काहीच दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्ष व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. 

या पत्रावर गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपील सिब्बल, शशी थरूर, भुपिंदर हुडा, मनिष तिवारी, विवेक तनखा, मुकुल वासनिक, विरप्पा मोईली, जतीन प्रसाद, पृथ्वीराज चव्हाण, पीजे कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, राजेंदर भट्टल, राज बब्बर, अखिलेश प्रसाद सिंह, अरविंदर सिंग लव्हली, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, कुल सिंह ठाकूर आणि संदीप दीक्षित यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *