राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर निवडणूक आयोगापुढे आज सुनावणी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित फुटीवर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ‘मीच राष्ट्रीय अध्यक्ष’ असल्याचे गुरुवारी दिल्लीत ठणकावले. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या दावेदारीवरून कायदेशीर लढाई रंगणार असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार नव्हे तर, अजित पवार असल्याचा दावा फुटीर गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला असून, त्यासाठी ७ हजार कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. शरद पवार यांच्या पक्षानेही ९ हजार कागदपत्रे आयोगाकडे दिली आहेत. अजित पवारांनी पक्षावर केलेल्या दाव्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दुपारी तीन वाजता दोन्ही गटांना युक्तिवादासाठी बोलावले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये तीनही आयुक्त उपस्थित असतील. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत.

शरद पवार यांनी पक्षात फूट पडली नसल्याचा दावा केला असला तरी, आयोगासमोरील सुनावणीमुळे दोन्ही गटांना कायदेशीर लढाई लढावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये घेऊन शरद पवारांनी अजित पवार गटाला थेट आव्हान दिले.

बैठकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करणारा ठराव संमत करण्यात आला. बैठकीतील भाषणामध्ये शरद पवार यांनी अजित पवार गटातील नेत्यांचा दावा खोडून काढला. ‘‘दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये १०-११ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये माझी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध झाली. माझी निवड बेकायदा असल्याचा दावा करणाऱ्यांनीच माझ्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती’’, असा शाब्दिक प्रहार शरद पवार यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झालेली नसताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ही मंडळी दावा सांगत आहेत. स्वत:ला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून घेत आहेत. कायद्याचे उल्लंघन करून चुकीच्या मार्गाने पक्षावर कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पवारांनी केला.

‘‘राज्य सरकारमध्ये मंत्री होण्याआधी संबंधित आठ नेते माझ्याकडे येऊन गयावया करत होते. आमच्या मागे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या अडचणीतून तुम्ही मार्ग काढा. आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला नाही तर आम्हाला ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जावे लागेल, असे ते मला सांगत होते. या नेत्यांनी माझी साथ सोडली. पण, अनिल देशमुख  यांच्यासारखे काही नेते तुरुंगात गेले तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले’’, असे सांगत पवार यांनी भाजपला लक्ष्य केले.