देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान-समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई ,१० मार्च / प्रतिनिधी :-“आज देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्च पासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. पुढची नीती ठरवण्याची पावलं उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार काय म्हणाले?

पंजाबमध्ये आधी काँग्रेसची सत्ता होती. मात्र आता चित्र वेगळं दिसत आहे. हा बदल काँग्रेस पक्षाला एकप्रकारे झटका देणारा आहे. ‘आप’ या अलीकडे बनलेल्या राष्ट्रीय पक्षाने दिल्लीतील गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्या प्रकारचं यश संपादन केलं आणि ज्यापद्धतीचं प्रशासन दिलं त्याला दिल्लीकरांनीही पसंती दिली. केजरीवाल यांच्या दिल्लीतील सरकारसंबंधी सामान्य माणसांची मतं जर जाणून घेतली तर ती मतं केजरीवालांच्या तसेच आम आदमी पक्षाच्या बाजूने असतात. आरोग्य, प्राथमिक शिक्षण यासंबंधित आप पक्षाने ज्या सुविधा पोहचवल्या त्याच आधारावर दिल्लीतल्या लोकांनी त्यांना निवडून दिलं.पंजाब हे तसं दिल्लीचं निकटवर्तीय राज्य आहे. त्यामुळे दिल्लीच्या कामाचा परिणाम हा पंजाबमध्येही झाला. या आधी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वातील सरकार होते. मात्र केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षासोबत लढण्याच्या त्यांच्या निर्णयाचा लोकांवर नकारात्मक प्रभाव पडला. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे आणि पंजाबच्या शेतकऱ्यांचा केंद्र सरकारविरूद्ध जो राग होता तो मतदानात दिसल्यामुळे त्यांनी आप पक्षाला संधी दिली.उत्तर प्रदेशात पाहिल्यास समाजवादी पक्षाला जेवढ्या जागा मिळाल्या त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बहुमत जरी मिळाले नसले तरी समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात आपला जम बसवला आहे, हे दिसून आले. तृणमूल काँग्रेसने ऐनवेळेस गोव्याच्या निवडणुकीत सहभाग घेतला. अन्य पक्षाचे लोक घेऊन निवडणूक लढवणं त्यांनी टाळलं असतं तर बरं झालं असतं. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार बहुमत दृष्टीपथात असलेला पक्ष सरकार बनवेल. गोव्यात सरकार स्थापनेसाठी आम्ही लक्ष घालावे असे सध्या तरी वाटत नाही.