नांदेडच्या घटनेची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडून दखल ; अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई,३ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंवरून राज्य सरकारव टीका केली जात आहे. या घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडमधील घटना सरकारने गांभीर्याने घेतली असून त्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे पोहोचले असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

काय आहे प्रकरण?

राज्याती नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. यानंतर पुढच्या २४ तासांत पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यात ४ बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेचे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्राने मागवला अहवाल

नांदेडच्या घटनेवर राज्यभरातून संतंप्त प्रतिक्रिया येत असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी रुग्णालय प्रशासनाला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेवर बोलताना त्या म्हणाल्या की, नांदेड रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून त्या बाबतीत खुलासा मागवला आहे. नेमके कोणते पेशंट होते? ते ऍडमिट कधी झाले होते? अशी सर्व माहिती मागवण्यात आली आहे.

याच बरोबर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी केंद्राकडून दखल घेण्यात आली असून लवकरच सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं भारती पवार म्हणाल्या आहेत.