छत्रपती संभाजीनगर सियाम कार्यालयाचे भव्य उदघाटन

छत्रपती संभाजीनगर,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-  रेल्वे स्टेशन येथील बजाज भवन येथे राज्याचे कृषी आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांच्या शुभहस्ते सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) च्या नूतन कार्यालयाचे भव्य उदघाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सचिन कलंत्री (महाव्यवस्थापक, महाबीज), श्री. विकास पाटील (कृषी संचालक-नि. व गु.) उपस्थित होते. त्यावेळेस अध्यक्ष, सचिव व कार्यकारी मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर सियाम च्या वतीने श्री. सुनील चव्हाण, श्री. सचिन कलंत्री, श्री. विकास पाटील यांचा सियामच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. प्रथम श्री. समीर मुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी बियाणे उद्योगासमोर असणाऱ्या समस्या व बियाणे उद्योगाचे आजचे प्रश्न, महाराष्ट्र शासन तयार करीत असलेले नवीन कायदे या बाबींचा आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये उल्लेख केला व कृषी आयुक्तांनी आमच्या बियाणे व्यवसायात येणाऱ्या अडचणीमध्ये लक्ष घालून त्या समस्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावे. अशी विनंती यावेळी केली.     

कृषी आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांच्या शुभहस्ते एशियाअँड पॅसिफिक सीड असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मनीष पटेल यांचा सियामच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांसमोर श्री मनीष पटेल यांनी आपल्या भाषणामध्ये जागतिक परिस्थिती, भारतातील शेती, शेती व बियाणे उद्योगा समोरील प्रश्न, समस्याबाबत उपस्थितासमोर अभ्यासपूर्ण विवेचन केले.यानंतर झालेल्या चर्चा सत्रामध्ये उपस्थित बियाणे उत्पादकांनी कृषी आयुक्तासमोर बियाणे उत्पादकांना येणाऱ्या अडचणी व समस्या याबाबत माहिती दिली. व त्याचे निवारण करण्याची विनंती केली.
            कृषी आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सियाम करीत असलेल्या कार्याची प्रशंसा केली व त्याचबरोबर शेतकरी हिताचे कायदे करीत असताना प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बियाणे उत्पादकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याबाबत शासन दक्षता घेईल, अशी ग्वाही दिली. तसेच बियाणे उत्पादकांनी मांडलेल्या समस्याबाबत संबंधितांना योग्य कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल. असे सांगितले.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शालिग्राम वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. रितेश मिश्रा केले.

सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) ची  वार्षिक सर्वसाधारण सभा

सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) ची 10 वी सर्वसाधारण सभा श्री. समीर मुळे, (अध्यक्ष, सियाम) यांचे अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथील 

बजाज भवन येथे मोठ्या उत्साहात झाली. यावेळी सन २०२३- २४ च्या वार्षिक अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.
         सभेत श्री. सतीश कागलीवाल, श्री. रितेश मिश्रा, श्री. दिलीप देशमुख, श्री. मुकुंद करवा, श्री. सचिन भालिंगे, श्री. किशोर वीर, श्री. नाथा राऊत, श्री. अजित मुळे, श्री. वैभव काशीकर, श्री. प्रभाकर शिंदे, श्री. राघवेंद्र जोशी, श्री. समीर अग्रवाल व डॉ. शालिग्राम वानखेडे यांच्यासह बियाणे उत्पादक कंपन्यांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       श्री आर. व्ही. शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सभा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण झाल्याचे सभागृहाचे निदर्शनास आणून दिले. प्रथमता सभा सुरू करण्यापूर्वी नुकतेच निधन झालेले भारतातील हरितक्रांतीचे प्रणेते, थोर शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना उपस्थितांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांचे परवानगीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात करण्यात आली.
       सुरुवातीला सियामच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजास सुरुवात होण्यापूर्वी सियामच्या वतीने नॅशनल असोसिएशन व स्टेट असोसिएशनचे उपस्थित सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये श्री. राघवन संपत कुमार (कार्यकारी संचालक,फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडिया नवी दिल्ली), डॉ. पी. पी. झवेरी (सचिव, गुजरात सीड इंडस्ट्री असोसिएशन), श्री अशोक कटेशिया (कार्यकारी संचालक, गुजरात सीड इंडस्ट्री असोसिएशन), श्री. मुरलीधर रेड्डी (अध्यक्ष सीडसमन असोसिएशन, हैदराबाद), श्री. सुभाष पारीख (डायरेक्टर टेक्निकल, सीड्स असोसिएशन ऑफ मध्य प्रदेश), श्री. दिपांकर, श्री. यशपाल सैनी (नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली) या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
      श्री. मुकुंद करवा (सचिव, सियाम) यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून सभेपुढे सादर केला. श्री. सचिन भालिंगे (कोषाध्यक्ष, सियाम) यांनी सन २०२२ -२३ चा वार्षिक ताळेबंध व लेखापरीक्षण अहवाल सादर केला. त्यानंतर त्यांनी सन २०२३- २४ चा वार्षिक अर्थसंकल्प सभेपुढे सादर केला. वरील दोन्ही बाबीस सर्वसाधारण सभेने एकमताने मान्यता दिली.
      सभेमध्ये श्री. सतीश कागलीवाल (माजी अध्यक्ष, सियाम) यांनी उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या चर्चासत्रामध्ये सन्माननीय सदस्यांनी भाग घेऊन बियाणे उत्पादन आणि विक्री या विषयावर चर्चा केली व आपले प्रश्न सभेसमोर मांडले.
    श्री. समीर मुळे (अध्यक्ष सियाम) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बियाणे व्यवसायातील अडचणी, या वर्षी निर्माण होणारी दुष्काळ सदृश्य परिस्थिती, महाराष्ट्र शासन नव्याने तयार करीत असलेले बियाणे विषयक कायदे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, याबाबत सभागृहास अवगत केले. यासाठी सर्व बियाणे उत्पादकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. असे त्यांनी नमूद केले. बियाणे उद्योगाचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘सियाम’ सर्वात पुढे राहील, याबाबत सर्व सदस्यांना आश्वासित केले. त्यासाठी सर्व सदस्यांनी सियामला सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.कार्यक्रमाचे शेवटी श्री. मुकुंद करवा (सचिव, सियाम) यांनी उपस्थित सर्व कंपनी सदस्यांचे आभार मानले.