राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई: राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी याबाबतची घोषणा मुंबईत केली.

पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत. त्याआधी पार पडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. नुकताच या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यानंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झालीये. १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशपत्रे दाखल करण्याची मुदत आहे. या निर्देशपत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान २५ ऑक्टोबरपर्यंत हे नामनिर्देशपत्रे मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ला सकाळी साडेत सात ते साडेपाच या वेळेत मतदान पार पडणार आहे. तर याची मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.

गडचिरोली, गोंदियात मतदान

नक्षलग्रस्त भाग असलेले गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात मात्र सकाळी साडेसात ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर ७ नोव्हेंबरला या ठिकाणची मतमोजणी केली जाणार आहे.