खेळाडूंचे प्रात्यक्षिके व मशाल रॅली काढून ऑलिम्पिक दिन साजरा

आंतरराष्ट्रीय खेळाडू व  शालेय  विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

औरंगाबाद ,२३ जून /प्रतिनिधी :-23 जून हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन निमित्ताने औरंगाबाद शहरात ऑलिंपिकचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, विभागीय क्रीडा संकुल समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ऑलिम्पिक मशाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रज्वलित करुन डेफ ऑलिंपिक खेळाडू आदिती निलंगेकरकडे सोपविण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सदस्य डॉ. उदय डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक  संघटनेचे सचिव डॉ.मकरंद जोशी, क्रीड़ा-भारतीचे सचिव डॉ.संदीप जगताप, राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे गोकुळ तांदळे यांच्यासह अनेक क्रीडा संघटक, क्रीडा  शिक्षकांची उपस्थिती होती. डेफ ऑलम्पिक खेळाडू आदिती निलंगेकर हिचा कुलगुरू यांच्या हस्ते बॅग देऊन सत्कार करण्यात आला.


रॅलीच्या प्रारंभी ऑलिंपिक ध्वजामध्ये असलेल्या लाल, हिरवा , निळा, पिवळा व काळा रंगाचे फुगे मान्यवरांच्या हस्ते हवेमध्ये सोडण्यात आले. विविध क्रीडा प्रकारांच्या खेळाडूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी श्री गजानन महाराज मंदिर चौकात श्री विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले,श्रीमती छाया मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रात्यक्षिक, श्री महेश इंदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वूशू चे प्रात्यक्षिक , श्री सागर मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी खेळाचे प्रात्यक्षिक , श्री सुरेश मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे खेळाचे प्रात्यक्षिक , राहुल टाक यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग खेळाचे प्रात्यक्षिक युवा खेळाडूंनी सादर केले. त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.
मशाल रॅलीमध्ये विविध खेळांच्या खेळाडूंसह ज्ञानप्रकाश विद्या मंदिर, धारेश्वर विद्यालय , आर पी नाथ हायस्कूल, कलावती चव्हाण हायस्कूल, शिवछत्रपती महाविद्यालय, रिव्हरडेल हायस्कूलच्या जवळपास 1100 विद्यार्थी खेळाडूंनी उस्फूर्तपणे सहभागी होत श्री गजानन महाराज मंदिर ते विभागीय क्रीडा संकुल पर्यंत मशाल रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. मशाल रॅलीस माननीय कुलगुरू महोदय यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. रॅलीतील सहभागी खेळाडूंच्या हातामध्ये ऑलिंपिक खेळाडूंचे फोटो असलेले बोर्ड होते, त्याचप्रमाणे ऑलिम्पिकचा ध्वज व विविध रंगाचे ध्वज खेळाडूंनी हातामध्ये घेतले होते त्याच प्रमाणे ऑलिंपिक खेळ , क्रीडा संस्कृती व देशभक्तिपर विविध घोषणांनी वातावरण मध्ये चैतन्य निर्माण झाले होते. चरणजीत संघा व श्री भिकन अंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅलीसही माननीय कुलगुरू महोदय यांच्या हस्ते ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. कुलगुरू महोदय व इतर मान्यवरांनी खुल्या जीपमधून श्री गजानन महाराज मंदिर चौक ते विभागीय क्रीडा संकुल या पर्यंत खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने टोप्या व क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षकांना ऑलिम्पिकचे टी-शर्ट देण्यात आले होते. रॅलीचे समन्वयक कैलास वाहुले, श्रीमती काळकर , रणजित पवार, श्री सागर मगरे , श्री विनायक राऊत, रोहित गाडेकर , श्री पाटिल सर, श्री पोटे सर आदींचा मान्यवरांच्या हस्ते क्रीडा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप जगताप यांनी केले तर आभार श्री अभय देशमुख यांनी मानले. ऑलिंपिक दिनाचे भव्य दिव्य व सुटसुटीत,व्यवस्थित नियोजन करण्यासाठी श्री चंद्रशेखर घुगे, सुरेश मिरकर, डॉ. दिनेश वंजारे, तुषार आहेर, संतोष अवचार, विकास सूर्यवंशी, डॉ. पंढरीनाथ रोकडे, पुनम नवगिरे, श्रीनिवास मोतीयेळे , अनिल जाधव, श्री आशुतोष मिश्रा, राहुल टाक, श्री चव्हाण आदींनी पुढाकार घेतला.