बुलढाण्यात ट्रकला भीषण अपघात ; ४ जणांचा मृत्यू तर ६ गंभीर जखमी

बुलढाणा ,२ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-बुलढाण्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर हा अपघात घडला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मजुरांना उपचारासाठी तातडीने मलकापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचालक मात्र अपघातानंतर पसार झाला आहे. पोलिसांकडून ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे.

अपघात मरण पावलेले तसंच जखमी झालेले सर्व मजूर हे मध्यप्रदेशातील असून ते कामासाठी बुलढाण्यात आले होते. प्रकाश धांडेकर, पंकज जांभेकर, अभिषेक जांभेकर अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तीन मजुरांची नावं असून एका मजुराची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम सुरु होतं.

या पुलाच्या कामासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथून कामगार आले होते. रविवारी दिवसभर काम केल्यानतंर हे मजूर रस्त्याच्या कडेला टीनशेडमध्ये झोपले होते. कामगार झोपेत असतानाच आज(२ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास एक भरधाव ट्रक थेट टीनशेडमध्ये घुसला. या घटनेत ४ मजुरांचा मृत्यू झाला तर ६ मजूर गंभीर जखमी झाले. चालकाचं ट्रकवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे.