बीडचा सुपुत्र अविनाश साबळेने रचला इतिहास, स्टीपलचेसमध्ये भारतासाठी जिंकले सुवर्णपदक

हांगझोऊ :-रेकॉर्डतोड कामगिरी करणाऱ्या अविनाश साबळेने आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. २९ वर्षीय साबळेने होंगझाऊ येथील आशिया चषकात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने ८.१९.५० सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. त्याने ८.२२.७९ सेकंदाचा आशियाई स्पर्धेचा रेकॉर्ड तोडला.

मराठमोळ्या अविनाश साबळे याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने ८:१९:५३ मिनिटे पूर्ण केले. या स्पर्धेतील भारताचे हे १२वे सुवर्णपदक आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत लांब पल्ल्याच्या धावपटूंच्या नावावर भारताचा कोटा रिक्त होता. पण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात १३ सप्टेंबर १९९४ रोजी जन्मलेल्या अविनाश साबळे याने ती जागा भरून काढली. अविनाश साबळे हे सर्वसामान्य कुटुंबात वाढले. अविनाशचे आई-वडील शेतकरी आहेत आणि अविनाशला त्याच्या शाळेत ६ किलोमीटर चालत जावे लागत होते. अविनाशने खेळात करिअर करण्याचा कधी विचार केला नव्हता पण आज त्याने स्टीपलचेसमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला.