लातूर नाट्यगृहाच्या कामात दिरंगाई का ?मंत्री अमित देशमुख यांची नाराजी

लातूर, दि.16:- नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला लातूर महापालिकेच्या वतीने रसिक लातूरकर नागरिकांसाठी बांधण्यात येत असलेल्या अद्यावत नाट्यगृहाच्या कामाचा आढावा पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेऊन या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच या नाट्यगृहाच्या कामाचे गुत्तेदार यांनी पुढील बैठकीत स्वतः उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, उपअभियंता रोहन जाधव व खाजगी सल्लागार श्री बांगड, गुत्तेदार यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, या अद्यावत नाट्यगृहचे काम 12 महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना त्यात दिरंगाई का होत आहे याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कामाचे संबंधीत कामाचे गुत्तेदार यांनी द्यावी. हे नाट्यगृह काम पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या प्रत्येक टप्प्यावरील कामाची वेळोवेळी माहिती लातूर महापालिकेचे महापौर व आयुक्त यांना सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांनी दिली पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले.आजच्या अद्यावत नाट्यगृहाच्या बांधकामाच्या आढावा बैठकीस या कामाचे संबंधित ठेकेदार यांनी स्वतः उपस्थित राहणे अपेक्षित असताना ते या बैठकीस गैरहजर आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजवावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी नाट्यगृहाच्या सद्यस्थितीतील कामाची माहिती घेतली. तसेच नाट्यगृहास मंजूर असलेला निधी व त्यातून खर्च झालेला निधी ची माहिती घेतली. त्याप्रमाणेच पुढील कामास आवश्यक असलेल्या निधीची ही माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेने याबाबत संयुक्त बैठक घेऊन निर्णय घ्यावा असे त्यांनी सूचित केले.

महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी नाट्यगृहाच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांच्याकडून महापालिकेस कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. त्यामुळे या कामावर महापालिकेच्या अभियंत्यांनी देखरेख ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांनी परवानगी द्यावी. तसेच या संपूर्ण कामाचा आराखडा हा 35 कोटी 63 लाखाचा असून राज्य शासनाकडून फक्त 15 कोटी रुपये मंजूर झाले असल्याने उर्वरित निधी शासनाकडून मिळवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात यांनी लातूर शहरातील अद्यावत नाट्यगृहाच्या बांधकामाची संक्षिप्त माहिती दिली.या कामासाठी बांधकाम विभागाकडून 24 कोटी चा प्रस्ताव शासनाला सादर केलेला होता परंतु शासनाने पंधरा कोटींच्या निधीला मान्यता दिली असून हा निधी प्राप्त झालेला असून याअंतर्गत 3 कोटी 25 लाखाचे काम पूर्ण झाले असून सदरील नाट्यगृहाचे स्थापत्याचे कामे सुरू असून हे काम प्लिंथ लेव्हलपर्यंत आलेले आहे असे त्यांनी सांगितले. तर उपअभियंता रोहन जाधव यांनी नाट्यगृहचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या कामासाठी आवश्यक अतिरिक्त 20 कोटीचा निधीचा प्रस्ताव शासनाला सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी नाट्यगृहाच्या कामाचे सादरीकरण आर्किटेक्चर श्री. बांगड यांनी पावर पॉइंट द्वारे केले. यामध्ये नाट्यगृहाची एकूण आसन क्षमता तेराशे इतकी असून नाट्यगृह परिसरात दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंगची सुविधा तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *