मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू!

मुंबई : कुठे अधिक तर कुठे कमी पाऊस अशी परिस्थिती असताना, आता नैऋत्य मान्सून देशातून माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे. वायव्य राजस्थानातून मान्सून माघारी फिरला असून मागील ५ दिवसांपासून वायव्य राजस्थानात पाऊस नाही. सोबतच कोरडे वातावरण असल्याने भारतीय हवामान विभागाकडून देशातून मान्सून मागे फिरत असल्याची घोषणा केली आहे.

यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरु झाला आहे. सर्वसाधारणपणे १७ सप्टेंबरला मान्सून माघारी फिरत असतो, मात्र यंदा २५ सप्टेंबर रोजी मान्सून परतण्यास सुरुवात झाली. याआधी भारतीय हवामान विभागाने २५ सप्टेंबरच्या आसपास मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल, असे सांगितले होते. यानंतर आज हवामान विभागाने घोषणा करत मान्सूनचा परतीला प्रवास सुरु झाल्याचे सांगितले आहे.

नैऋत्य मान्सून सामान्यपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, त्यानंतर ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. साधारणपणे १७ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. त्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरु असतो.

महाराष्ट्रात मागील काही दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणांमधील पाणीसाठी वाढल्याने दिलासा मिळाला आहे.