टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची वसईमध्ये मालिकेच्या सेटवरच आत्महत्या!

वसई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शनिवारी दुपारी मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. तुनिशा २० वर्षांची होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

तुनीषाने वसई पूर्वेच्या कामण येथील स्टुडिओमधील प्रसाधनगृहात गळफास लावला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिने नेमकी आत्महत्या का केली तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का त्याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषा सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होती.दरम्यान, नाताळच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्दैवी घटना घडल्याने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे.