मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा  शिक्का आता पुसणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या जनतेला दिली.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांना संबोधित करतांना श्री. शिंदे म्हणाले की, हैदराबादच्या  मुक्तिसंग्रामात अनेकांनी  योगदान दिले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या राष्ट्रीय शाळांमधून या चळवळीची सुरुवात झाली. ‘वंदेमातरम’ने या चळवळीला गती दिली. विद्यार्थ्यांच्या चळवळीतून या मुक्तिसंग्रामाची सुरुवात झाली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान जनता सदैव स्मरणात ठेवेल.

श्री. शिंदे म्हणाले की, हैदराबाद मुक्तिसंग्रामाची प्रेरणा कायम राखण्यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्यात स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे पुढील पिढ़्यांना या मुक्तिसंग्रामाची प्रेरणा मिळत राहिल. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी 45 हजार कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विकास कामांचा संकल्प करण्यात आला आहे

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाच्या पर्वाची ही सुरुवात आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना सरकार गती देत आहे. ही गती देत असताना नवे प्रकल्पही कार्यान्वित करण्यात येत आहेत. केंद्रशासनाच्या मदतीनेही अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मराठवाड्यात रस्ते विकास, आरोग्य , शिक्षण, सिंचन, कृषी अशा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मराठवाड्याची भुमि ही इथल्या जनतेने मोठ्या कष्टाने समृद्ध केली आहे. सध्या पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून यंदा एक रुपयात पीक विमा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना जी  मदत लागेल ती मदत देण्यास शासन कटीबद्ध आहे. मराठवाड्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. मराठवाड्याला विकासित प्रदेश म्हणून आपण पुढे नेण्याचा संकल्प करु या,असे आवाहन यावेळी श्री. शिंदे यांनी केले.

वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानींप्रति मुख्यमंत्र्यांचा आदरभाव;

श्रीमती देशपांडे यांना त्यांच्या जागेवर जाऊन भेटले

ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी श्रीमती विमल देशपांडे या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत असतांना त्यांना तेथेच बसू द्या; मीच येऊन भेटतो असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः त्यांच्यापर्यंत गर्दितून वाट काढत पोहोचले व त्यांची आस्थेने विचारपुस केली.हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या आदरभावाचे दर्शन उपस्थितांना झाले. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी गेले. तेथे भेटत असतांना समोरुन 90 हून अधिक वर्षे वय असणाऱ्या श्रीमती विमल देशपांडे या त्यांना भेटण्यासाठी येत असतांना मुख्यमंत्र्यांना दिसल्या. त्यांना वयोमानामुळे गर्दीतून वाट काढणे शक्य होत नव्हते. त्यांची अवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की, त्यांना तेथेच बसू द्या, मीच तेथे येतो. असे म्हणत मुख्यमंत्री श्रीमती देशपांडे यांच्या पर्यंत पोहोचले आणि त्यांची विचारपूस केली.