मेघ छाबडाने जालन्याचे नाव देशात लौकिक केले – आ.कैलास गोरंटयाल

जालना ,११ सप्टेंबर /प्रतिनिधी :- आंतरराष्ट्रीय बायोलॉजी ऑलिम्पियाड मध्ये सुवर्ण पदकासह नीट मध्ये देशात ६२ वा क्रमांक प्राप्त करून मेघ छाबडा याने जालन्याचे नाव देशभरात लौकिक केले असून त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांना निश्चितपणे प्रेरणा देईल असा विश्वास आ.कैलास गोरंटयाल यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
जालना शहरातील मोदीखाना परिसरातील रहिवाशी असलेल्या छाबडा परिवारातील मेघ छाबडा याने आंतरराष्ट्रीय बायोलॉजी ऑलिम्पियाड  मध्ये सुवर्ण पदक आणि नीट परीक्षेत भारतात ६२ वा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल आ.कैलास गोरंटयाल यांनी मेघ छाबडाच्या मोदीखाना येथील निवास्थानी भेट देऊन पुष्पगुच्छ देत कौतुक करून अभिनंदन केले.यावेळी पालक डॉ.धीरज छाबडा,डॉ.तरूणा छाबडा, वैजीनाथ कदम,माजी नगरसेवक विष्णु वाघमारे,जीवन सले,दत्ता पाटील घुले,जगदीश भरतीया आदींची उपस्थिती होती.

यावेळी आ.कैलास गोरंटयाल म्हणाले की,उद्योगनगरी अशी जालना शहराची ओळख आहे.येथील स्टील,बियाणे उद्योगामुळे जालना शहराचे नाव देशात अग्रस्थानी असले तरी शिक्षणाच्या बाबतीत मात्र जालन्याचे नाव अद्याप पिछाडीवर आहे.मात्र,ही उणीव आता मेघ छाबडाने भरून काढत जालना आता शैक्षणिक क्षेत्रात देखील मागे नसल्याचे आपल्या कुशल अशा बुद्धिमत्तेतुन सिद्ध केले आहे.मेघ छाबडा याने मिळवलेले घवघवीत यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चित प्रेरणा देईल असा विश्वास आ.गोरंटयाल यांनी यावेळी व्यक्त केला.