आत्मनिर्भर भारतासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ लोकप्रिय करण्यासाठी मदत करण्याचे पंतप्रधानांचे धार्मिक नेत्यांना आवाहन

नवी दिल्ली, दि. १६ :   भक्ती चळवळ’ ज्या पद्धतीने स्वातंत्र्यलढ्याचा पाया होती, त्यापद्धतीनेच, आज आत्मनिर्भर भारताचा आधार आपल्या देशातील संत, महात्मा, महंत आणि आचार्य यांनी पुरवावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.  जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जयंती निमित्त  ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ चे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज अनावरण केल्या नंतर पंतप्रधान बोलत होते. याप्रसंगीच्या त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्ये म्हणजे, स्वातंत्र्यचळवळ आणि सध्याचे आत्मनिर्भर भारत सारख्या सामाजिक-राजकीय आणि आर्थिक घटनांचा पाया धार्मिक आणि अध्यात्मिक होता यावर त्यांनी दिलेला भर. 

‘भक्ती आंदोलनाने’ स्वातंत्र्यचळवळीचा पाया रचला. आपल्याला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, त्यावेळी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील व्यक्ती संत, महंत, ऋषी आणि आचार्य यांच्यामुळे प्रभावित झाले होते आणि त्यांच्यात देशाप्रती जाणीव निर्माण झाली होती. या जाणीवेमुळे स्वातंत्र्यचळवळीला पाठबळ मिळाले, असे ‘व्होकल फॉर लोकल’वर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी धार्मिक नेत्यांना आत्मनिर्भर भारताला चालना देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, ज्यापद्धतीने ‘भक्ती चळवळीमुळे’ स्वातंत्र्यलढ्याचा पाया निर्माण झाला होता आणि पाठबळ मिळाले होते, तसेच आज 21 व्या शतकात, आत्मनिर्भर भारताचा पाया संत, महंत आणि आचार्य यांनी तयार करावा. त्यांनी विनंती केली की, ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश धार्मिक नेत्यांनी आपल्या अनुयायांना नियमितपणे द्यावा. धार्मिक नेत्यांच्या पाठिंब्यामुळे ‘व्होकल फॉर लोकल’ संदेशाला पाठबळ मिळेल. यामुळे देशाला स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच आत्मनिर्भरतेची प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, भारताने जगाला नेहमीच शांती, अहिंसा आणि मैत्रीचा मार्ग दाखवला आहे. अशाच मार्गदर्शनासाठी आज जग भारताकडे पाहत आहे. जर, तुम्ही भारताचा इतिहास पाहिला तर, ज्या ज्या वेळी आवश्यकता निर्माण झाली त्यावेळी समाजात काही संतांचा उदय झाला, आचार्य विजय वल्लभ असेच एक संत होते. जैनाचार्य यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांचा उल्लेख करुन पंतप्रधानांनी शैक्षणिक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर केल्याबद्दल प्रशंसा केली, जैनाचार्यानी ,भारतीय मुल्ये जोपासत पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश याठिकाणी अनेक संस्था उभा केल्या आणि या संस्थांमधून अनेक उद्योजक, न्यायाधीश, डॉक्टर आणि अभियंते तयार झाले आणि त्यांनी राष्ट्राची सेवा केली, असे पंतप्रधान म्हणाले.

या संस्थांनी महिलांसाठी केलेल्या शैक्षणिक कार्याचे देशावर ऋण आहेत , असे पंतप्रधान म्हणाले. या संस्थांनी कठीण काळात महिलांच्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. जैनाचार्यांनी मुलींसाठी अनेक संस्थांची स्थापना करुन महिलांना मुख्य प्रवाहात आणले. आचार्य विजय वल्लभ जी हे  दयाळू, कनवाळू आणि सर्व जीवांवर प्रेम करणारे होते, त्यांच्या आशीर्वादाने पक्षी रुग्णालय आणि अनेक गोशाळा देशभर कार्यरत आहेत. या काही सामान्य संस्था नाहीत. या भारताचा आत्मा आणि भारतीय मुल्यांचे मुर्त स्वरुप आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी  जैनाचार्यांच्या कार्याचा गौरव केला.