त्याचवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलं होतं, मी खोटं बोलत असेल तर..! अजित पवारांचा कोल्हापुरात गौप्यस्फोट

कोल्हापूर : शरद पवारांची सभा कोल्हापुरात पार पडल्यानंतर आज (10 सप्टेंबर) अजित पवार गटाची उत्तर सभा झाली. हसन मुश्रीफ यांनी उत्तर सभेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना आणखी एक गौप्यस्फोट केला. तसेच ईडीच्या भीतीने भाजपला मांडीला मांडी लावून बसल्याची टीका होत असल्याने प्रत्युत्तर दिले. 

अजित पवारांनी कोणता गौप्यस्फोट केला?

अजित पवार सभेला संबोधित करताना म्हणाले की, राज्याचा विकास कसा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत गेला नाही, लोकांची कामे करण्यासाठी आमच्यावर दबाव होता. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरात बसता येत नाही. आमच्याबद्दल चुकीचा मेसेज पसरवला जात आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत होते त्यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबत 52 आमदारांच्या सहीच पत्र दिलं होतं. हे जर खर नसेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन. खरं असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का? अशी विचारणा त्यांनी केली. 

तसेच सत्तेत सामील होण्यासाठी यशवंतराव चव्हाणांचा मार्ग वापरल्याचे म्हणाले. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनीही आपल्या भाषणात यशवंतराव चव्हाणांचा संदर्भ देत आपला निर्णय कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अजित पवारांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ‘काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही

आमच्यावर दबाव होता तो काम करण्यासाठी होता, आमदारांना निधी देण्यासाठी दबाव होता, राज्याच्या कामासाठी दबाव होता. मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची औलाद आहे, भाषण करून काम होत नाही त्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार पुढे म्हणाले की, कोल्हापुरात होणारी उत्तरदायित्व सभा माझ्यासाठी महत्वाची आहे. कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचे केंद्र कायम राहिलं आहे, बळीराजावरचं दुष्काळाचं सावट दूर करावं हे अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील अनेक भागात अजून म्हणावा तसा पाऊस नाही. 

आताच्या केंद्र सरकारने साखर कारखान्यांचा टॅक्स माफ केल्याचे सांगितले. याआधी कुणीही टॅक्स माफ केला नाही. असं झालं नसत तर सरकारी साखर कारखाने उद्धवस्त झाले असते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना एफआरी देताना होत होता. अडचणीत असलेले साखर कारखाने बाहेर काढले तर काय चुकले? असेही अजित पवार म्हणाले. 

बंडाविषयी भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ‘अजित पवार तिकडे गेले, त्यांच्यावर दबाव होता, हो आमच्यावर लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता. आम्ही पण मराठ्यांची औलाद आहे. फुसक्या दबावाला भीक घालत नाही. आता आमची बदनामी करण्याचं काम सुरू आहे’.

‘ जातीय सलोखा कधीही बिघडू नये, अशा पद्धतीने काम करायचं आहे. आम्ही विरोधी पक्षात असल्याने काही काम करू शकत नव्हतो. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी सरकार चालवत आहोत. आता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत गेला नाही, असे ते म्हणाले .

‘काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही, अशा शब्दात अजित पवारांनी उद्धव ठाकरे टोला लगावला.

मराठा आरक्षणावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले,आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात प्रयत्न करत आहोत. आम्ही मनोज जरांगे यांना समजून सांगत आहोत. मात्र, मनोज जरांगे समजून घेत नाहीयेत. आता त्या मागणीवर दुसरे मोर्चे निघत आहेत. आता आम्ही वेगळ्या परिस्थितीत आहोत. या प्रश्नावर सर्वच पक्षांना चर्चेसाठी बोलावले आहे. सर्वांची मते नेमकी काय हे जाणून घेऊ’.

विराट सभेचा सविस्तर वृत्तांत 

कोल्हापूरची सभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अत्यंत महत्त्वाची सभा आहे. जसे मुंबई हे देशाचे आणि राज्याचे आर्थिक केंद्र, पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते त्याप्रमाणेच राज्यातील बहुजन आणि पुरोगामी विचारांचे शहर म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुरोगामी विचारसरणी ही छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या सर्वसमावेशक लोककल्याणाच्या प्रेरणेतून आली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज तपोवन मैदानात झालेल्या विराट सभेत केले.

राज्यात काही ठिकाणी दुष्काळाचे सावट असताना हे सावट दूर होण्यासाठी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झालो. राज्यात चाऱ्याची आणि पाण्याची मागणी आहे. पुढील काळात समाधानकारक पाऊस राज्यात पडून जे संकट राज्यावर येत आहे ते दूर व्हावे, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाराज हे फक्त राजे नाही तर भविष्याचा वेध घेणारे द्रष्टे समाजसुधारक होते. त्यांनी अनेक क्षेत्रात मार्गदर्शनाचे काम केले. आज आम्ही ज्या गोष्टींचा पाठपुरावा करतोय त्या गोष्टी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी केल्या. हे आम्हाला प्रेरणा देणारे कार्य आहे. शाहू महाराजांनी सर्वप्रथम शैक्षणिक सुधारणेचे काम केले, त्याप्रमाणेच आम्ही शैक्षणिक सुधारणेसाठी महाज्योती, सारथी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना देतोय. यासोबत आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजासाठी काम सुरु असल्याचे अजितदादांनी सांगितले.

आमच्यावर दबाव असल्याची टीका होते. आमच्यावर लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता, आमदारांच्या कामांवर स्थगिती बसण्याचा दबाव होता, आम्ही इतर कोणत्याही दबावाला भीक घालणारे नाही. आम्हीदेखील मराठ्याची औलाद आणि शेतकऱ्याची मुलं आहोत, असे ठाम प्रतिपादन अजितदादांनी केले.

कोल्हापूर जिल्ह्यात विद्यापीठासाठी असलेला प्रलंबित निधी ३१ मार्च २०२४ च्या पूर्वी दिला जाईल. जिल्ह्यात आयटी कंपन्या येण्यासाठीचे वातावरण आपल्याला तयार करावे लागणार आहे. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात घेऊन घरी बसता येत नाही. माझे सर्व सहकारी हे लोकांची कामे करणारे नेते आहेत. आजही मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो. संधी मिळाल्यावर लोकांची कामे केली पाहिजेत. लोकहिताला प्राधान्य देणे हाच आमचा मार्ग आहे. सत्ता ही बहुजनांच्या प्रगतीकरता गरजेची असते. त्यानुसार सर्व बहुजनांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय. राजकारण युती आणि आघाडीपलीकडेही आहे. हे राज्यातील जनतेने ओळखले पाहजि. विचारांची लढाई ही विरोधाची होऊ नये, याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात समोर आला त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे. मात्र या आरक्षणातून इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला अडचण होऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या प्रमुखांना राज्यातील सर्व राजकीय पक्षांची बैठक आयोजित केला आहे. ज्यातून चर्चा करून मार्ग सोडण्याचे काम आम्हाला करायचे आहे. जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे अशांना आरक्षण मिळाले पाहीजे या विचाराचे आम्ही आहोत.

अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी सध्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी कारखान्यांवरचा आयकर माफ केला. यापूर्वी हे घडलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या गोष्टी घडत असतील तर साथ द्यायला काय हरकत आहे? जी-२० ही जागतिक परिषद दिल्लीत सुरु आहे. ज्यातून जगामध्ये भारताचे नाव वाढले, या जागतिक परिषदेचे नेतृत्व मा. नरेंद्र मोदीसाहेब करत आहेत.

डीपीडीसीचा निधी जिल्ह्याला मिळतो. ज्यामध्ये कोल्हापूरमधील खासबाग मैदान परिसरात गंगावेश तालीम, शाहूपुरी तालीम, मोतीबाग तालीम, काळा ईमाम तालीम आहे. या तालमीला सरकारच्या जिल्हा वार्षिक योजनेतील पैसा देता येत नाही. या तालमींना डीपीडीसीचा पैसा देण्यात यावा, असे अजितदादांनी जाहीर केले.

काळम्मावाडी धरण गळती रोखण्यासाठी ८० कोटी खर्च येणार आहे. हा निधी आम्ही निश्चित देणार. आम्ही सत्तेत काम करायला आलोय. लोकांचे काम करण्याचा आमच्यावर दबाव होता. तरी काही लोक आमची बदनामी करतात, हे आपण ओळखले पाहिजे. कोल्हापूरात थेट पाईपलाईनसाठी लागणारा पैसा निश्चित दिला जाईल. शहरे वाढतात तेव्हा शहराजवळील गावे शहर हद्दीत घ्यावी लागतात. आता आपण पुढच्या पिढीचा आणि पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करायला हवा. त्यासाठी राजकारण न आणता सर्वांनी एकोप्यातून हित साधावे. विकासासाठी कोल्हापूरमध्ये निधी देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही यावेळी अजितदादांनी दिली.

कोल्हापूरच्या तपोवन मैदनात आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विराट सभेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थितांना संबोधित केले. या मैदानात अनेक विराट सभा झाल्या, त्या त्या काळात त्या भव्यच होत्या. परंतु आज सर्व सभांचे रेकॉर्ड ब्रेक करणारी सभा झाली, याबद्दल सर्व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. काल जिल्ह्यात प्रचंड पाऊस होता म्हणून सभेबद्दल अनेक चिंता व्यक्त झाल्या, पण तरीही सभेने गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक केला याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. ही सभा ईर्षा करण्यासाठी नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील विकासाच्या कामांवर आणि प्रलंबित प्रश्नांवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.

अजितदादांचे कोल्हापूर जिल्ह्यावर प्रेम आहे. हा जिल्हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. कलेच्या, शिक्षणाच्या, शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता शाहू महाराजांनी केली. त्याप्रमाणेच अजितदादांनीदेखील राज्य सरकारमध्ये संधी मिळाल्यावर काळम्मावाडी धरणातून थेट पाईपने पाणी आणण्यासाठी पाचशे कोटींचा निधी, मराठा तरूण विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेला १७६ कोटी निधी, करवीर निवासीनी अंबाबाई तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी निधी, शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पन्नास कोटी, जिल्हाधिकारी कार्यालय, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग कुस्ती मैदान अशा अनेक सुविधांसाठी शेकडो कोटींचा निधी दिला आहे. यासोबतच करवीर निवासीनी अंबाबाई मंदिराचा सुधारित तीर्थक्षेत्र आराखडा, ज्योतिबा देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कोल्हापूर शहर हद्दवाढ, खंडपीठ निर्मिती, तसेच काळम्मावाडी धरणाच्या गळतीच्या प्रश्नासाठी ८० कोटींचा निधी, या व इतर प्रलंबित विकासाच्या प्रश्नांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने निधी मिळाला तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले जातील, असे मुश्रीफ म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी मिळाली आहे. वैद्यकीय सेवा हा माझ्या आवडीचा विषय आहे. यापूर्वीही राज्य शासनात काम करताना ज्या संधी मला दिल्या गेल्या त्यात कायदे आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न मी केला. आता कोणाला काही झाल्यास त्यावर उपचार करण्याची आणि त्यांना निरोगी करून घरी सोडण्याची जबाबदारी मी उचलली आहे. समाजातील तळागाळातील माणसाला सामर्थ्य देऊन उभे करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्यात शेंडा पार्क येथे सातशे खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय हॉस्टेल, लेक्चर हॉल, ग्रंथालय अशा विविध विकासकामांचे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल. या वास्तूंच्या उद्घाटनासाठी आणि इतर कामांच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बोलवण्याची विनंती त्यांनी यावेळेस अजितदादांना केली.

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी भव्य सभेत उपस्थितांशी संवाद साधला. अजितदादा पवार यांनी देशाच्या व राज्याच्या विकासासाठी जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब इथे आलेल्या एवढ्या मोठ्या जनसमुदायाने केले आहे. देश आणि राज्य एका विचाराचे असेल तर त्या देशाच्या विकासाला गती मिळते. या विचाराने हा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल सबंध कोल्हापूरकरांचे त्यांनी आभार मानले.

कोल्हापूरच्या विकासासाठी, ज्या प्रश्नांची उकल करण्यासाठी तुम्ही मा. अजितदादांवर विश्वास टाकला, अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये कोल्हापूरच्या विकासासाठी येणाऱ्या कालवधीत १०० टक्के निर्णय घेतले जातील. आपल्याला लोकसभेच्या ४८ जागांवर याच विचाराने महायुतीचा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी केले.

या उत्तरदायित्व सभेस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित केले. देशाला दिशा देण्याचे काम या कोल्हापूरातून झाले आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. तुमची ही गर्दी साक्ष आहे की महाराष्ट्रातील जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मा. अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

समाज कल्याणासाठी सत्तेत सामील व्हा, असे महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही सांगितले. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून राज्य सरकार निर्णय घेत काम करत आहे. धनगर, तेली, बंजारी, कुणबी, बारा बलुतेदार असो वा भटके विमुक्त, या सर्वांना आरक्षण देण्याचे काम आदरणीय शरद पवार साहेबांनी केले, हे आम्ही कधी विसरू शकत नाही. त्याबद्दल त्यांचे ऋणी आहोत.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पहिल्यापासून भूमिका आहे. पण ते टिकाऊ आरक्षण मिळाले पाहिजे. दलित, मागासवर्गीय, ओबीसी यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

महाराष्ट्र विभागता कामा नये, दुफळी निर्माण होता कामा नये, महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी सर्वांनी एकत्र साद घातली पाहिजे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

विराट उत्तरदायित्व सभेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ज्या तपोवन मैदानात ही सभा होत आहे त्याला ऐतिहासिक इतिहास आहे. एकीकडे मा. हसन मुश्रीफ साहेबांचे कर्म आणि मा. अजितदादांची बुद्धी या दोघांचा संगम याच सभेने होतोय. मा. अजितदादांनी काम एके काम आणि राज्याच्या विकासाशिवाय विचार केला नाही. आज सकाळापासून पुण्यातून सुरु झालेल्या दौऱ्यात जनतेने केलेला सत्कार आणि गाठीभेटी पाहून अजितदादा राज्याचे लोकनेते आहेत, याची प्रचिती याद्वारे आल्याचे समाधान धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सभेला संबोधित केले. आम्ही घेतलेली भूमिका आणि पेललेली जबाबदारी म्हणजे आमचे उत्तरदायित्व आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत ही ऐतिहासिक सभा होत आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा संगम याच कोल्हापूरच्या मातीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जनता अजितदादांच्या मागे आहे हे आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या कोल्हापूरकारंनी दाखवून दिले याबद्दल सर्वांचे आभार. कोल्हापूर जिल्ह्यातील नेतृत्व म्हणून हसन मुश्रीफ साहेबांच्या मागे संपूर्ण जिल्हा उभा राहतो. याचे कारण इथे जातीपातीचे राजकारण होत नाही, तर काम बोलले जाते. डॉक्टर, पाणीदार मंत्री, श्रावण बाळ अशाप्रकारच्या उपाध्या कोल्हापूरकरांनी मुश्रीफ साहेबांना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील या उत्तरदायित्व सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण जी साथ दिली आहे ती साथ अशीच कायम राहूद्या, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सभेत उपस्थितांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांवर टिका होते की त्यांनी आपली विचारधारा भाजपचरणी अर्पण केली. तसेच इतर आरोप आणि टिकाटिपण्णी करतात. मात्र त्यांना मी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते शिव-शाहू-फुले- आंबेडकरांच्याच विचारधारेवर मंत्रिमंडळात काम करत आहे. याउलट भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात, सर्वसमावेशक मंत्रिमंडळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. आपल्याला सर्व घटकाला सोबत घेऊन जायचे आहे. आमची कुस्ती ही नेमकी कोणासोबत तर तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत आहे. आज कोल्हापूरची जनता अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत याचा अभिमान वाटतो.

या सभेस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आ. राजेश पाटील, आ. मकरंद पाटील, आ. विक्रम काळे, माजी आमदार के.पी.पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवा नेते पार्थ पवार, युवा नेते नाविद मुश्रीफ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, कोल्हापूर शहाराध्यक्ष आदिल फरास, कोल्हापूर महिलाध्यक्ष शीतल फराकटे आदी उपस्थित होते.