“तुमच्यावर लाठ्या, गोळ्या चालवणाऱ्यांसाठी मराठवाडा बंद करुन टाका”, राज ठाकरेंच मराठा आंदोलकांना आवाहन

जालना ,४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जनंतर राज्याचं राजकारण तापताना दिसत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची जाऊन भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला.

राज ठाकरे म्हणाले की, “मागे जेव्हा मराठा मोर्चे निघाले होते. तेव्हाचं मी तुह्माला म्हणालो होतो की, तुम्हाला आरक्षण कधीच मिळणार नाही. हे सर्व राजकारणी तुमचा फक्त वापर करून घेतील. त्यांनी मत पाडून घेतील. हा मुद्दा सरळ सुप्रीम कोर्टाचा आहे. ते सतत तुम्हाला आरक्षणाचं आमिष दाखवाणार, कधी हे सत्तेत असतात तर कधी ते विरोधात. सत्तेत आले की, ते तुमच्यावर गोळ्या झाडतात”, अशा कठोर शब्दात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसह सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी राज ठाकरे आंदोलकांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही पोलिसांना अजिबात दोष देऊ नका. पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा आदेश ज्यांनी दिला, त्यांना दोषी ठरवा. पोलीस काय करणार? ते तुमच्या आमच्यातलेच सामन्य आहेत. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या नावाखाली तुमच्याकडे मतं मागितले होते. मी तेव्हाच सांगितलं होतं की, हे शक्य नाही. आपले गडकिल्ले सुधारले पाहिजे. दरम्यान, तुमच्यासमोर आरक्षणाचं आणि पुतळ्याचं राजकारण केलं जातं. मी आज तुमच्यासमोर भाषण कऱण्यासाठी मुळीच आलो नाही. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या आणि गोळ्या चालवल्या त्यांच्यासाठी मराठवाडा बंद करून टाका”, असं आवाहन राज ठाकरे यांनी आंदोलकांना केलं.

ते पुढं म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस म्हणतात, याचं राजकारण करू नये, का करू नये, तुम्ही काय केलं असतं, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला किंमती जीव गमावू नका. त्यांच्यासाठी एकजण गेला तर काही फरक पडत नाही. पण आपल्यासाठी तो जीव महत्त्वाचा आहे. या लोकांच्या नादी लागू नका. आता निवडणुका नाहीत. मात्र निवडणुका आल्या की, काठीचा हल्ला लक्षात ठेवा”, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी आंदोलकांना केलं.