शिवसेना आमदार बोरणारे यांच्याकडून विकास कामांच्या उदघाटनाचा धडाका

अनेक कामांचे दुसऱ्यांदा उदघाटन सेना-भाजप आणि काँग्रेसमध्ये कामाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ

वैजापूर ,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून वैजापूर तालुक्यातील गंगथडी भागात विकास कामांच्या उदघाटनाचा धडाका सुरू असून, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून एकाच कामाचे अनेक वेळा उदघाटन होत असल्याने सध्या तालुक्यात हा विषय चर्चेचा बनलेला आहे.
तालुक्यातील गंगथडी भागातील पुरणगांव- डोणगांव (प्रजिमा-31) या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते.या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 1 कोटी 55 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, माजी  नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती व काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्याहस्ते 20 सप्टेंबर रोजी या रस्त्याच्या कामाचे उदघाटन होऊन रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली.त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी शिवसेना आमदार रमेश पाटील यांच्याहस्ते पुन्हा दुसऱ्यांदा या रस्त्याचे उदघाटन करण्यात आले.

Displaying IMG-20211020-WA0102.jpg

या रस्त्यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा करून तो मंजूर करून आणल्याचे या भागातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांचे म्हणणे आहे, तर आ.बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने हा रस्ता मंजूर झाल्याचा दावा शिवसेना कार्यकर्ते करीत आहेत. या रस्त्याच्या कामावरून काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांत श्रेयवाद सुरू आहे.
त्याचप्रमाणे याच भागातील नागमठाण-चेंडूफळ या रस्त्याच्या कामावरूनही भाजप-सेना कार्यकर्त्यांत वाद सुरू आहे. अर्थसंकल्पीय निधी 5054 (64) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या 28 कि.मी.या रस्त्याचे मजबुती व डांबरीकरण कामाचे उदघाटन सराला बेटाचे मठाधिपती ह.भ प.रामगिरी महाराज यांच्या हस्ते व आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली 17 ऑक्टोबर 2021 रोजी झाले. या रस्त्याचे काम सेना-भाजप युती सरकारच्या काळात मंजूर झालेले असून, दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते या रस्त्याच्या कामाचे उदघाटन झाले होते. पुन्हा दुसऱ्यांदा शिवसेनेतर्फे या कामाचे उदघाटन करण्यात आले.त्यामुळे भाजप-सेना कार्यकर्त्यांत कलगीतुरा सुरू आहे.नागमठाण येथील पुलाच्या कामावरूनही  सेना-भाजप कार्यकर्त्यांत आरोप-प्रत्यारोप सुरू असून, राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय आहे.सध्या तालुक्यात विविध विकास कामांच्या उदघाटनांचा  धडाका सुरू असून, सेना-भाजप आणि  काँग्रेस मध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे.