तुषार दोषी सक्तीच्या रजेवर,जालन्याच्या पोलीस अधीक्षकपदी शैलेश बलकवडे

तातडीने स्वीकारला पदभार

जालना ,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्रालयाने तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाने आता शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर शैलेश बलकरवडे यांनी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. जालन्याच्या अंतरवली गावात मराठा आरक्षणसाठी अमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमारनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी शैलेश बलकरडे यांनी या आधी नागपूर ग्रामीण, गोंदिया, कोल्हापूर याठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारनंतर सरकारने कारवाई करायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवून शैलेश बलकवडे यांची जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. बलकवडे यांनी तातडीने पदभार स्वीकारला असून जालन्यातील घटनेचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.