जालना मराठा आंदोलनाचे पडसाद मुंबईपर्यंत ; ठाकरे गटाकडून मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर आंदोलन

मुंबई ,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अणानुष लाठीमार नंतर राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्यापुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. या घटनेने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं असून सलग तिसऱ्या दिवशी देखील तणाव कायम असल्याचं चित्र आहे. आज मुंबईत देखील या घटनेचे पडसात दिसून आले. या घटनेच्या निषेधार्ध ठाकरे गटाने रविवारी सकाळी मरीन ड्राईव्हवर आंदोलन सुरु केले आहे.

जालन्यातील आंतरवली सराटी गावात मराठा आंदोलनकर्त्यांनी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आपला विरोध दर्षवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे तरुण आणि कार्यकर्त्ये लक्षणीय संख्येने मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर जमले. पहाटेपासूनच सुरु झालेल्या या आंदोलनामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे आंदोलन आझाद मैदानात हलवण्याचे पोलिसांचे आदेश असूनही कार्यकर्त्यांते मरीन ड्राइव्हवर निदर्शन करण्याच्या त्यांच्या निर्धारावर ठाम होते.

तिसऱ्या दिवशीही तणाव कायम

जालन्यात पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला आहे. या घटनेचे पडसाद आज तीसऱ्या दिवशी देखील उमटताना दिसत आहेत. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तसंच लाकूर शहरासह जिल्ह्याभर कडकडीत बंद पाळून या निषेध नोंदवण्यात येत आहे. तसंच लातूर बार्षी महामार्गावर साखरपाटी येथे महामार्गावर टायर पेटवून वाहतूक ठप्प केल्याने मोठा अडथडा निर्माण झाला होता.

दरम्यान, जालन्यातील आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध सर्वस्तरातून व्यक्त केला गेला. गेल्या दोन दिवसांत ७५० जणांवर जाळपोळ आणि दगडफेकीशी संबंधित गुन्हे दाखल झाले आहेत. तर एकून १५ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. तणावपूर्ण परिस्थिती बघता ८ तारखेचा महाराष्ट्र सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.