भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करावी- शरद पवारांचं मोदी आणि शाह यांना आव्हान

मुंबई,३० ऑगस्ट /प्रतिनिधी :-मुंबईत I.N.D.I.A आघाडीची बैठक होत आहे. उद्या म्हणजे 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक होत आहे. या बैठकीची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरु आहे. मुंबईतल्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये ही पत्रकार परिषद सुरु आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे शरद पवार , ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे , काँग्रेसचे बाळासाहेब थोरात , नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारच्या काळात देशातील महिला सुरक्षित नसल्यानंच बिल्किस बानो आणि मणिपूरच्या महिलांवर अत्याचार होत असल्याची टीका ठाकरेंनी केली. तर मोदी शाहांनी केवळ भ्रष्टाचाराचे आरोप करू. त्यांच्याकडे यंत्रणा आहेत त्यांनी सखोल चौकशी करावी असं आव्हान शरद पवारांनी दिलंय. 

शरद पवारांचा आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेकवर टीका केली. राष्टवादी काँग्रेकवर टीका करत असताना राज्य सहकारी बँक आणि इरिगेशन घोटाळ्याबद्दल सांगितलं. पण सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती पंतप्रधानांकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तूस्थिती समाजासमोर ठेवावी. नुसता आरोप करण्यात अर्थ नाही, तूमच्या हाताता अता सत्ता आहे, चौकशी करा असं आव्हान शरद पवार यांनी केलं आहे. 

तसंच अनेक राज्यातून इंडिया आघाडीला प्रसिसाद मिळत असून लोकांना आता देशात परिवर्तन हवं आहे, इंडियाच्या बैठकीसाठी 28 पक्षाचे प्रतिनिधी हजेरी लावणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. 

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
केंद्रापासून मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप यावेळी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केला. तसंच सध्या देशात आणि राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. गेल्या 9 वर्षांत रक्षा बंधन झाले नव्हते का? त्यावेळी केंद्र सरकारने गॅस दरवाढ का कमी केली नाही,  निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गॅसदरवाढीचा निर्णय घेतला गेला असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. केंद्र सरकार सध्या गॅसवरती आहे. इंडिया आघाडीची ताकद वाढेल तेव्हा केंद्र सरकार गॅस सुद्धा मोफत देईल, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

इंडियाच्या बैठकीला आम्हाला आमंत्रण का दिलं नाही, याबद्दल काँग्रेसला विचारा, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितसोबत आमची युती असल्याचं स्पष्ट केलं. तसंच प्रकाश आंबेडकर यांची इंडिया आघाडीत येण्याची इच्छा आहे का ते विचारावं लागेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान इंडिया आघाडीत यापूर्वी 28 पक्ष होते, अता 36 पक्ष असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. तसंच  इंडियाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

दिग्गज नेते मुंबईत
इंडिया बैठकीसाठी दिग्गज नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झालीय. फारुख अब्दुल्ला मुंबईत दाखल झालेयत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजच दुपारी 4 वाजता इंडिया बैठकीसाठी मुंबईत दाखल होतायत. ममता बॅनर्जी मुंबईत दाखल होताच अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत..तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या दुपारी मुंबईत येणार आहेत. त्यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढाही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. 

बैठकीची जोरदार तयारी
उद्या मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे.  इंडिया आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या नेत्यांसाठी ग्रँड हयात हॉटेलमध्ये 170 रुम बुक करण्यात आल्यायत. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे ग्रँड हयातमध्ये दाखल झाल्यायत. रुम बुकींगची जबाबदारी ठाकरे गटाकडे देण्यात आलीय. तर उद्याचं रात्रीचं जेवण ठाकरे गटाकडून दिलं जाणार आहे. या जेवणात मराठमोळे पदार्थ ठेवले जाणार आहेत. तसंच 1 सप्टेंबरला दुपारचं जेवण काँग्रेसकडून दिलं जाणार आहे. यासोबतच बैठकीतील माहिती माध्यमांना देणे ही जबाबदारी देखील काँग्रेसकडे असणार आहे. राष्ट्रवादीकडे सर्व नेत्यांसाठी गाड्यांचं नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आलीय..