राखी सावंत चौकशीसाठी अंबोली ठाण्यात स्थानबद्ध

मुंबई, दि. १९ जानेवारी/प्रतिनिधीः वादग्रस्त कलावंत राखी सावंत यांना अंबोली पोलिसांनी गुरुवारी स्थानबद्ध केले. मॉडेल शर्लिन चोप्रा हिच्याबद्दल वादग्रस्त भाषा वापरली व व्हिडीओज, छायाचित्रे पोस्ट केल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी ही स्थानबद्धता आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बंडोपंत डी. बनसोडे म्हणाले की, राखी सावंत यांना अंबोली पोलिस स्थानकात चौकशीसाठी आणण्यात आले असून त्या स्थानबद्ध आहेत. चोप्रा यांनी सावंत यांच्याविरोधात नोव्हेंबर, २०२२ मध्ये तक्रार दिली होती. गुरुवारी दुपारी त्यांनी ट्विटमध्ये दावा केला  की, अंबोली पोलिसांनी राखी सावंत यांना अटक केली. परंतु, त्यांना सध्या प्रश्न विचारले जात आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे.

राखी सावंत यांनी शर्लिन चोप्रा यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये दिलेल्या तक्रारीत चोप्रा यांनी माझ्या खासगी आयुष्याबद्दल आरोप केले होते, असे म्हटले. राखी सावंत यांचा या प्रकरणी अटकपूर्व जामीनअर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या घडामोडी घडल्या.
राखी सावंत-शर्लिन चोप्रा यांचे एकमेकांशी भांडण व प्रेम गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांत सतत सुरू आहे.