‘स्वारातीम’ विद्यापीठात झंकारणार सितारचे स्वर 

विदुर महाजन यांच्या मैफिलीचे आयोजन 

नांदेड, २९ ऑगस्ट  / प्रतिनिधी :- कोणत्याही वाद्याचे सूर रसिक श्रोत्याला अद्भुत जगाची सफर घडवत असतात. देहभान विसरून श्रोत्यांना आनंदरसात चिंब करण्याची शक्ती संगीतामध्ये असते. असाच अनुभव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात येणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार विदूर महाजन यांच्या सितारच्या स्वरांनी विद्यापीठ झंकारणार आहे. 

विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुल आणि ‘थिंक महाराष्ट्र’ च्या वतीने ८ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये विदुर महाजन यांच्या ‘महेफिल-ए-सितार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी दिली. यावेळी डॉ. शिवराज शिंदे व प्रा. किरण सावंत हे विदुर महाजन यांच्याशी सांगीतिक प्रवासाविषयी संवाद साधणार आहेत. 

मैफलीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे राहणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, प्रा. अपर्णा महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

उद्योजक म्हणून तीन दशके यशस्वी कार्य केल्यानंतर मागील २५ वर्षांपासून विदुर महाजन यांनी सतारीसाठी पूर्णवेळ वाहून घेतले. देश विदेशात त्यांचे आठशेपेक्षा जास्त कार्यक्रम झाले आहेत. अभिनेत्री नेहा महाजन यांच्यासमवेत ‘खेडोपाडी सतार’ या प्रकल्पातून त्यांनी देशातील विविध गावांमध्ये प्रवास करून नव्या पिढीला सितारचे प्रशिक्षण दिले. विदुर महाजन हे कवी व लेखक म्हणूनही प्रसिद्ध असून त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत.  

‘महेफिल-ए-सितार’ हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून संगीतप्रेमी रसिकांनी मैफलीचा लाभ घ्यावा असे आवाहन संकुलाच्या वतीने डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. शिवराज शिंदे, प्रा. किरण सावंत, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. नामदेव बोंपिलवार यांनी केले आहे.