3 लाखांहून अधिक ग्राहकांची वीजबिलांच्या ऑनलाईन पेमेंटला पसंती

रांगेत उभे न राहता घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढता कल

छत्रपती संभाजीनगर,२९ ऑगस्ट /प्रतिनिधी :- महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात टेक्नोसेव्ही ग्राहकांची संख्या वाढत असून, दर महिन्याला सरासरी ३ लाखांहून अधिक ग्राहक वीजबिल ऑनलाईन भरण्यास पसंती देत आहे. त्यामुळे ग्राहकांचे बिल भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचतोय. यासह ऑनलाईन पेमेंटवर ग्राहकांना 0.25 टक्के सवलतही मिळत आहे.

            छत्रपती संभाजीनगर परिमंडलात जुलै महिन्यात 3 लाख 18 हजार 301 ग्राहकांनी 100 कोटी 57 लाख रुपयांची  वीजबिले ऑनलाईन भरली आहेत. वितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाईन पद्धतीने कितीही  रकमेचे वीजबिल ऑनलाईन भरता येते. त्याची कार्यपद्धती महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.  वीजबिल क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग व ‍यूपीआय इ. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी भरता येते. तसेच भारत बिल पेमेंट सिस्टिमद्वारेही (BBPS) वीजबिल भरता येते. ‍5 हजार रुपयांपेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस/एनईएफटीद्वारे बिल भरता येते.

          क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने वीजबिल भरण्यास कसलेही शुल्क लागत नाही. तसेच ऑनलाईन पेमेंटला बिलाच्या रकमेच्या 0.25 टक्के इतकी सवलत देखील देण्यात आलेली आहे. वीजबिलांचे ऑनलाईन पेमेंट अत्यंत सुरक्षित असून, त्यास रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-2007 च्या तरतूदी लागू आहेत.

तात्काळ मिळते पोच

वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केले आहे.

‘गो-ग्रीन’द्वारे वर्षाला 120 रुपये वाचवा

महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी ‘गो-ग्रीन’ योजनेत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा 10 रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.