पोलिसांकडून लाठीमार:जे घडले त्यात प्रशासनाचीच चूक – राज ठाकरे

या दुर्दैवी घटनेला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार

मुंबई : काल जे घडले त्यात प्रशासनाची चूकच आहे. पण ते ज्या कारणांनी घडले त्याला गेल्या वीस वर्षात महाराष्ट्राचे विस्कटलेले राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणे आणि ते पाडून दुसरे सरकार आणणे यातून जे काही शौर्य दाखवण्याची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल, असे आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे यांनी लाठीमाराचा निषेध व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेऊन आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली त्या आंदोलनांचा इतिहास बघितला तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हटलं तसं की ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा जगाने आदर्श घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की पूर्व इतिहास पाहता आंदोलकांनी कोणतच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे येथे सरकारचं चुकलं हे निश्चित, असे राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राहता राहिला प्रश्न या संवेदनशील विषयाचा, तर या दुर्दैवी घटनेला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का?, ते न्यायालयात टिकेल का?, बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घोडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल? यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?, इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाही तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं, असे राज ठाकरे म्हणाले.