“कोकणी बांधवांनी जमिनी विकू नये”, राज ठाकरेंचं कोकणी शेतकऱ्यांना आवाहन

पेण ,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग असून सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचे हे आंदोलन असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो. पण माणसाचं गेलेलं आयुष्य भरता येत नाही, असं म्हणत त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या चाळणीवरुनसरकारवर हल्लाबोल केला. तसंच यावेळी त्यांनी कोकणी बांधवांना जमिनी विकू नका, असं आवाहन देखील केलं.

आज रायगड जिल्ह्यातील कोलड याठिकाणी बोलताना राज ठाकरे यांनी गेल्या १५ वर्षात मुंबई-गोवा महामार्गावर अडीच हजार जणांचा अपघातामुळं मृत्यू झाल्याचं सांगितलं. गेल्या १७ वर्षापासून हा रस्ता का होत नाही, कारण तुम्हाला राग येत नाही.जी माणसं तुम्हाला लुटत आली त्यांच्याच हातात तुम्ही सत्ता देत आहात. तु्म्ही जागृत रहा, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही कोकणी बांधव खड्डे सहन करत आहेत. याचा तुम्हाला राग कसा येत नाही.या रस्त्यावर खड्यामुळे किती अपघात झाले असतील, किती लोक गेली असतील.मनसेच्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतही असो. अजचं असो वा कालचं. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेलं नसतं. असं म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.

यावेळी बोलताना त्यांनी कोकणी बांधवांना जमिनी न विकण्याचं आवाहन केलं. मुंबई-गोवा महामार्ग नीट न करण्याचं कारम म्हणजे अत्यंत कमी किंमतीत कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. ज्यावेळी रस्ता होईल त्यावेळी १०० पट किंमतीनं व्यापाऱ्यांना हे लोक जमिनी विकणार. त्यामुळं कोणीही जमिनी विकू नका, असं आवाहन राज यांनी कोकणी शेतकऱ्यांना केलं.