लातूर जिल्ह्याच्या विकासाचा वारसा कायम सुरु राहील – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

लातूर जिल्ह्यात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  • शेतकरी, मागासवर्गीय व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील
  • उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान
  • जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी आराखडा तयार होणार

लातूर ,१५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. शेतकरी, मागासवर्गीय व दुर्बल घटकातील व्यक्तींच्या उन्नतीसाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात असून यामाध्यमातून लातूर जिल्ह्याच्या विकासाचा वारसा कायम सुरु राहील, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी आज येथे दिली.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपिता वीरपत्नी, विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी एनडीआरएफ च्या निकषापेक्षा अधिक दराने नुकसान भरपाई दिली जात आहे. जिल्ह्यात मार्च-2023 पर्यंत गारपीट, वादळ, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 10 कोटी 56 लाख 55 हजार रुपये निधी वाटप करण्यात आला आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीने जळकोट तालुक्यासह इतर भागात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून लवकरच मदत वितरीत करण्यात येईल. केवळ एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतपिकांसाठी विमा संरक्षण घेण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 8 लाख 62 हजार 325 म्हणजेच जवळपास 99 टक्के शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असल्याची माहिती मंत्री ना. बनसोडे यांनी यावेळी दिली.

कृषि विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून गेल्या वर्षी 12 कोटी 25 लाख 12 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक उत्पादन अभियायातून 10 कोटी 37 लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. यावर्षीसाठी 19 कोटी 29 लाख रुपयांचा आराखडा शासनास पाठविण्यात असल्याची माहिती ना. बनसोडे यांनी दिली.

बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने लातूर व सातारा या केवळ दोन जिल्ह्यांची निवड केली आहे. जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 20 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. शेतरस्ते खुले करण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सुमारे 530 किलोमीटर लांबीचे 405 रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. राज्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरवर्षी प्रतिव्यक्ती 1800 रुपये रोख रक्कम त्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 798 लाभार्थ्यांना 80 लाख 8 हजार 950 रुपये वितरीत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

चांगल्या आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी प्रयत्न

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेची प्रतिवर्ष प्रतिकुटुंब उपचाराची संरक्षण मर्यादा दीड लाखावरून 5 लाख रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना ही योजना लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी आणि शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालये लवकरच कार्यान्वित होणार आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या आवारात 50 खाटांचा कार्डियाक केअर ब्लॉक मंजूर झाले आहे. त्याचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. हृद्ययाचे विकार असलेल्या गरीब रुग्णांना यामुळे उपचार मिळण्यास मदत होईल, असा विश्वास ना. बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.

लातूर येथे विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी शासनाने अडीच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. जळकोट तालुक्यातील जगळपूर आणि मंगरूळ येथे श्रेणी-1 पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन करण्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती ना. बनसोडे यांनी दिली.

मागासवर्गीयांसाठी महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीयांसाठी विविध महत्वाकांक्षी योजनांची  प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतून 79 कोटी 75 लक्ष रुपये शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रात महाविद्यालयात शिकत असलेल्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या एक हजार 560 विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून 6 कोटी 22 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला आहे, असे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे. आतापर्यंत 3 हजार 183 ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वितरीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला सन्मान योजनेतून महिलांना सर्व प्रकारच्या एस. टी. बस प्रवास भाड्यात शासनाने 50 टक्के सवलत लागू केली आहे. 17 मार्चपासून जिल्ह्यातील 73 लाख 96 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत ज्येष्ठ नागरिक योजना राबविली जात आहे. 75 वर्षांवरील नागरिकांना एस. टी. बस प्रवास भाड्यात 100 टक्के सवलत देण्यात आली आहे. गतवर्षीच्या 26 ऑगस्ट पासून 1 कोटी 35 लाख 6 हजार 430 व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतला आहे, असे ना. बनसोडे यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा तयार करणार

रोजगार निर्मितीसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबविली जात आहे. या योजनेतून 86 लाभार्थ्यांना 1 कोटी 65 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. तसेच शाश्वत विकासाच्या ध्येयांबाबत जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामध्ये जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून, त्यामध्ये अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे साध्य ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणार

जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. जिल्ह्यात गतवर्षी विविध चार खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाही राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा, राष्ट्रीय डॉटबॉल स्पर्धा आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बेसबॉल, सॉफ्टबॉल आणि जिम्नॅस्टिक्स या स्पर्धेत जिल्ह्यातील तीन खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करीत असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासन लोकाभिमुक्त करण्यासाठी विविध उपक्रम

यावर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह’ आयोजित करून शासकीय योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलाला 24 दुचाकी वाहनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 अद्ययावत चारचाकी वाहने पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरे झाले. अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘माझी माती, माझा देश’ ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सध्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत. यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात 75 व्याख्यानांच्या मालिकेसह विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ना. बनसोडे यांनी यावेळी केले.

ध्वजारोहणानंतर पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. परेड कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने यांनी या पथकाचे नेतृत्व केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा यावेळी ना. बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. उपस्थित सर्वांची भेट घेवून ना. बनसोडे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक उद्धव फड यांनी केले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

ध्वजारोहणानंतर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपिता वीरपत्नी, विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत शहीद जवान सुभेदार प्रमोद नारायणराव सूर्यवंशी यांच्या वीरमाता छबुबाई सूर्यवंशी, वीरपिता नारायणराव सूर्यवंशी, वीरपत्नी नंदा प्रमोद सूर्यवंशी यांचा ना. बनसोडे यांच्या हस्ते ताम्रपट देवून सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस विभागातील शहीद जवान पुंडलिक काटकर यांच्या पत्नी कमल काटकर आणि शहीद जवान धनंजय भातलवंडे यांच्या कुटुंबातील सदस्य छाया भातलंवडे यांचाही प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा ना.  बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कृषि विभागाच्या वैयक्तिक लाभार्थी, गट लाभार्थी, सामाईक पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाचे भौतिक व आर्थिक लक्षांक पूर्ण केल्याबद्दल जिल्हा संसाधन व्यक्ती धनंजय पवार यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

लातूर जिल्हा कारागृहातील शिपाई प्रल्हाद शिंदे यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह देवून, तसेच पाणी व स्वच्छता क्षेत्रात गेली दहा वर्षे काम करणारे माहिती व संवाद तज्ज्ञ उद्धव फड यांना ना. बनसोडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

  आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा सन्मान

आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना 2020-2021 अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त औसा तालुक्यातील उटी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, तसेच याच योजनेत 2020-22 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त लातूर तालुक्यातील कव्हा आणि अहमदपूर तालुक्यातील परचंडा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये पुरस्कार मिळविलेल्या लातूर तालुक्यातील बोपला ग्रामपंचायतीचे सरंपच व ग्रामसेवक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

अमृत महा आवास अभियानात उत्कृष्ट कामगिरीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा गौरव

अमृत महाआवास अभियानामध्ये उत्कृष्ट कामिगिरी करणाऱ्या औसा पंचायत समितीचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिरूर अनंतपाळ पंचायत समितीला द्वितीय, तर चाकूर पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अभियानातील सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून औसा तालुक्यातील आलमला ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि चाकूर तालुक्यातील चापोली ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतसाठीच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने औसा तालुक्यातील आलमला ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी ग्रामपंचायत आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने निलंगा तालुक्यातील बोटकुळ ग्रामपंचायतीचा ना. बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

राज्य पुरस्कृत आवास योजना योजनेतंर्गत उत्कृष्ट कामिगिरी करणारे औसा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि रेणापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या योजनेतील सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, औसा तालुक्यातील आलमला ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि देवणी तालुक्यातील दवणहिप्परगा ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ ग्रामपंचायतीला, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार लातूर तालुक्यातील वरंवटी ग्रामपंचायतीला आणि तृतीय क्रमांकाचा चाकूर तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला.

जिल्हा पोलीस दलास २४ अद्ययावत मोटारसायकली सुपूर्द

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्हा पोलीस दलासाठी 24 अद्ययावत मोटारसायकली प्राप्त झाल्या आहेत. या मोटारसायकली भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम व अद्यायवत बनविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून अद्ययावत मोटारसायकलींसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 26 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून प्राप्त झालेल्या 24 मोटारसायकली चार्ली पेट्रोलिंग, पोलीस स्टेशन ड्युटी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ताफ्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत.