चेरा येथील दिवंगत जवान शेख शादुल निजामसाहेब यांच्या कुटुंबियांचे मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून सांत्वन

दिवंगत जवानाच्या परिवाराला शासनास्तरावरून योग्य ती मदत देणार

लातूर,८ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी चेरा ता. जळकोट येथील दिवंगत जवान शेख शादूल निजामसाहेब यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. शासन स्तरावरून जी मदत शक्य असेल ते आपण करू, तसेच दिवंगत जवानयांची एक लहान मुलगी आणि मुलगा यांच्या पुढील शिक्षणाच्या बाबतीतही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर, तालुका स्तरावरील सर्व शासकीय यंत्रणा अधिकारी, सरपंच, पदाधिकारी,तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

जवान शेख शादूल निजामसाब यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा आहे. त्यांना उदरनिर्वाहसाठी कोणतेही साधन नाही, त्यामुळे त्यांना शासनाच्या कोणकोणत्या योजना देता येतील त्याच्या कागदपत्राची पूर्तता करून त्या योजना द्याव्यात अशा सूचना मंत्री संजय बनसोडे यांनी तहसीलदार यांना यावेळी दिल्या.

जवान शेख शादूल निजामसाब जळकोट तालुक्यातील चेरा येथील ‘बोर्डर रोड ऑरगनायझेशन’ ( निमलष्करी बल ) मध्ये जानेवारी 2010 पासून कार्यरत होते. आज पर्यंत त्यांच्या लेह, लदाक, कारगिल, तेजू येथे पोस्टिंग होत्या. सध्या ते तेजपूर येथे कार्यरत होते. तेथे कार्यरत असतानाच त्यांना कावीळ झाला. कावीळवर तेजपूर ( आसाम ) येथील मिलटरी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असतानाच 30 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचे निधन झाले होते. 3 ऑक्टोबर 2023 रोजी चेरा येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार झाले होते.