निलंगा रुग्णालयास तात्काळ पोर्टा व ड्युरा ऑक्सिजन प्रणाली उपलब्ध करून द्यावी-आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

निलंगा ,२२ एप्रिल /प्रतिनिधी 

लातूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे. या परिस्थितीत रुग्णांसाठी आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन अंत्यत गरजेचा आहे. या पार्श्वभुमीवर निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयास पोर्टा व ड्युरा ऑक्सिजन प्रणाली तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेली आहे.

निलंगा येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असून सध्या कोरोना संसर्गाने बाधीत रुग्ण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपचार घेत आहेत. कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ही चिंतेची बाब असून संसर्गाने बाधीत रुग्णांसाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन अंत्यत गरजेचे आहे. या ऑक्सिजनच्या वापरासाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे पोर्टा व ड्युरा ही प्रणाली उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या उपजिल्हा रुग्णालयास असलेले 37 ऑक्सिजन सिलेंडर जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या सुचनेवरून उदगीर येथील सामान्य रुग्णालयास देण्यात आलेले आहे.

सध्याच्या कोरोना संसर्गाच्या प्रार्श्वभूमीवर गरजवंत रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठादारास वारंवार विनंती करूनही नियमित पुरवठा होत नसल्याने या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे.या  बाबींचा विचार करून सामान्य रुग्णालय उदगीर येथे ज्या पद्धतीने ऑक्सिजन प्रणाली उपलब्ध केली तशीच निलंगा उपजिल्हा रुग्णालयास पोर्टा व ड्युरा ऑक्सिजन प्रणाली नवीन किंवा भाडेतत्वावर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे केली आहे. जेणेकरू या रुग्णालयात कोरोनाने बाधीत रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा करणे सहज शक्य होऊन त्यांचे प्राण वाचविण्यास मोठी मदत होणार आहे. ही प्रणाली तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून सबंधितांना आदेशित करावेत. अशीही मागणी आ. निलंगेकर यांनी केली आहे.