राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपले :ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर ,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांच निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी एन डी पाटील यांनी घेतला अखेरचा श्वास.  ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते म्हणून प्रा. एन. डी .पाटील यांना ओळखलं जातं.कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसापासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले आहे.मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नाही. ते उपचारास फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. एन. डी. पाटील यांना मे 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती .

शेतकऱ्यांचा,कामगारांचा  बुलंद आवाज हरपला

पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम. ए. केलं. त्यानंतर एल.एल.बी पूर्ण केलं. शरद पवार यांच्या भगिनी सरोज यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी त्यांची भेट झाली. रयत शिक्षण संस्थेशी जवळून संबंध आला. तिथे ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. याच दरम्यान त्यांनी नोकरी सोडून शेतकरी कामगार पक्षासाठी आपला पूर्ण वेळ देण्याचं ठरवलं. ते जीवनदानी कार्यकर्ते बनले. नंतर शेतकरी कामगार पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम सुरु केले. याच काळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने उग्र रूप घेतले. या लढ्यात अन्य नेत्यांच्या बरोबरीने एन. डीही सामील झाले होते.

संयुक्त महाराष्ट लढा  चालू असताना यशवंतराव चव्हाण यांनी शेकापमधील महत्वाच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये आणलं. शंकरराव मोहिते आणि यशवंतराव मोहिते हे दोन बडे नेते कॉंगेर्समध्ये गेले. पण, एन. डी यांनी पक्ष प्रवेश करण्यास ठाम नकार दिला. याचवेळी झालेल्या निवडणुकीत ते शेकापमधून विधानपरिषदेत निवडून आले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी सभागृह दणादूण सोडले. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांची सभागृहात चर्चा केली,  त्यांचे प्रश्न सोडवले.

8 जुलै 1978 रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस सरकार सत्तेत आलं. या बिगर-काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद. यात पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. पुलोदच्या या प्रयोगामुळे शरद पवार हे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले. पुलोद सरकारच्या मंत्रिमंडळात सुरूवातीला मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्रीच काम करत होते. त्यात उत्तमराव पाटील, सुंदरराव सोळुंके, अर्जुनराव कस्तुरे, निहाल अहमद आणि शेकापचे गणपतराव देशमुख. 2 ऑगस्ट 1978 रोजी नवीन 28 जणांना मंत्रिमंडळात घेत पवारांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. 

उपमुख्यमंत्रिपद सुंदरराव सोळंके यांच्याकडे सोपवण्यात आलं. शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गोविंदराव आदिक, दत्ता मेघे, सदानंद वर्दे, भाई वैद्य यांच्यासारखे नेतेही त्यावेळी पवारांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री होते. त्यात एन. डी. पाटील यांचाही या मंत्रीमंडळात समावेश होता. त्यांच्याकडे सहकार खाते दिलं होतं.

या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामकाजाची आजही चर्चा होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याची ठरलेली कापूस एकाधिकार योजना त्यांनीच सुरू केली. मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अंमलात आणला. एन डी पाटील यांच्यासमोर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श होता, त्याच आदर्शाने ते आयुष्यभर वागले. सत्तेत जायची संधी मिळाली, पण तेव्हाही त्यांच्या जगण्यात आणि साधेपणात काहीही फरक पडला नाही.

एन डी पाटील यांचा मुलगा सुहास याला मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता. एक दोन गुण कमी होते. मामा शरद पवार मुख्यमंत्री, वडील एन डी पाटील सहकारमंत्री पण त्याने वशिला लावला नाही. रांगेत उभा राहून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. वडिलांचा व्यवसाय या रकान्यात त्यांनी शेती असे लिहिले. अर्थात ही साधी शिकवणही त्याला एन. डी. पाटील यांच्यामुळेच मिळाली होती.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ज्याप्रमाणे एन. डी. पाटील यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता . त्याप्रमाणेच त्यांनी कर्नाटक बेळगाव सीमा प्रश्नही उचलून धरला होता. विधानपरिषदेच्या १८ वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कर्नाटक सीमा प्रश्न लावून धरत वेळोवेळी सभागृहात आवाज उठविला होता. आमदार झाल्यापासून आपल्या मानधनातील रक्कम गरीब कार्यकर्त्यांना देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नेता. आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकरी लोकांशी बांधिलकी मानुन काम करणारा हा लोकनेता. एकाचवेळी अनेक संस्थांचे नेतृत्व करत असताना त्या संस्थाचा कारभार आदर्श रीतीने झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका राहिली आहे.

आता आता म्हणजे कोरोना काळात घरगुती वीज बिलाची होळी करणारं आंदोलन त्यांनी केलं. वयाची नव्वदी पार झालेली. दोन्ही पायांना त्रास होतोय. चालता येत नाही. म्हणून घरात बसणारा हा नेता नाही. आयुष्यभर त्यांना लढणं हेच माहित आहे. सरकार कोणाचेही असो. पण ते श्रमिकांच्या हिताविरोधात निघालं की एन. डी. पाटील रस्त्यावर आलेच. लडेंगे जितेंगे ही त्यांची आवडती घोषणा. ती त्यांच्याच बुलंद आवाजात ऐकायला पाहिजे. एका बुलंदी वादळाचाही आज अंत झालाय. एक घोंघावणारं वादळ शांत झालंय. एका विचाराचा अस्त झालाय. आयुष्यभर घोंघावनाऱ्या या वादळानं आता कायमची विश्रांती घेतलीय. संघर्ष याचा दुसरा समानार्थी शब्द एन डी चा हा आता लोप पावला आहे.

जीवन प्रवास
संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य

१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
राजकीय कार्य

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

मिळालेले सन्मान / पुरस्कार

भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.