लातूर जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी 15 ऑगस्ट दिवशी एक झाड लावण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आवाहन

लातूर ,१३ ऑगस्ट /प्रतिनिधी :-लातूर जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी हरीत पट्टा ( ग्रीन बेल्ट ) आहे. हे अत्यंत चिंताजनक असल्यामुळे येत्या काळात प्रत्येक नागरिकांनी जागृतपणे वृक्षरोपण आणि ते जगतील याची काळजी घ्यावी लागेल. याची सुरुवात म्हणून 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी एक झाड लावायचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे.

15 ऑगस्ट 2023 रोजी प्रत्येक व्यक्ती आणि विशेषतः प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येकी एक झाड वैयक्तिक स्वरूपात लावावे. हा उपक्रम झाल्यानंतर प्रत्येक कार्यालय प्रमुख यांनी अधिकारी कर्मचारी यांनी कोणते झाड लावले , कोणत्या ठिकाणी लावले त्या झाडाच्या फोटोसह अहवाल 16 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हास्तरीय प्रमुख यांचेकडे पाठवायचा आहे अशा सूचनाही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिल्या आहेत.