लातूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात : पालकमंत्री अमित देशमुख

रेमडेसीवीर वापरासाठी आचारसंहिता लागू करण्याची पत्रकार परिषदेत दिली माहिती
लातूरात १७६१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; तर ८ जणांचा मृत्यु
Displaying 1.jpg

लातूर ,१४एप्रिल /प्रतिनिधी 

लातूर जिल्ह्यात आज एकाच दिवशी १७६१ कोवीड-१९ बाधित झालेले रूग्ण आढळून आलेले आहेत. यासाठी ५ हजार ४७९ तपासण्या करण्यात आल्या होत्या. ही आकडेवारी लक्षात घेता कोवीड प्रादूर्भावाचा वेग प्रचंड असल्याचे लक्षात येत आहे. असे असले तरी तो उपचारानंतर रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आज घडीला मृत्युचे प्रमाण फक्त १ शताश ७४ टक्के आहे. या वरून आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत असल्याचे दिसून येते. मात्र काही ठिकाणी रेमडिसीवीर या औषधाचा अनावश्यक वापर होत असल्याने त्याचा तुटवडा निर्माण होऊन खऱ्या गरजूना त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून रेमडेसीवीर इंजेक्शनचा कधी वापर करावा यासाठी मार्गदर्शनक सुचना जारी केल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परीषदेत दिली.

Displaying 3.jpg


पालकमंत्री देशमुख यांनी बुधवारी (दि.१४) सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोवीड-१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि बाधीत रूग्णांवरील उपचाराच्या दृष्टीने व्यापक आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर विक्रात गोजमगुडे, जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना पालकमंत्री देशमुख म्हणाले की, आज घडीला लातूर जिल्ह्यातील एकूण परिस्थिती नियंत्रणात असली तरी रूग्ण वाढीचे प्रमाण लक्षात घेता येत्या २० एप्रिल पर्यंत रूग्णसंख्या दूपटीने वाढण्याची तज्ज्ञ मंडळीकडून भिती व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व रूग्णांना योग्य उपचार मिळावेत म्हणून यंत्रणा उभारण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. लातूर शहरात एकूण २०० खाजगी रूग्णालये आहेत. त्या रूग्णालयांनी जास्तीत जास्त बेडची संख्या वाढवावी, प्रत्येक ठिकाणी किमान पाच तरी बेड वाढावेत अशी विनंती आएमए पदाधिकारी यांना केली आहे.

——————————————-

लातूरात १७६१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लातूर जिल्ह्यात बुधवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत १ हजार ७६१ नवे पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली तर गेल्या २४ तासांत  ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, दिवसभरात  विविध कोविड हॉस्पिटलमधून उपचार घेऊन बरे झालेल्या ६६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण १५७१ आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर प्रलंबित १३२ पॉझिटिव्ह आले. तसेच ३४९० रॅपिड ॲँटिजेन चाचण्यांमध्ये १०८३ पॉझिटिव्ह आढळले. असे एकूण १७६१ रुग्णांची भर पडली. तर ८ रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये ३२७८, तर होम आयसोलेशनमध्ये ९७३८ रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्याचा आतापर्यंतचा पॉझिटिव्ह आकडा ४८,५५५ वर गेला आहे. पैकी आतापर्यत ३४ हजार ७१८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या १०३६ रुग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर आहेत.

—————————————–

विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेत तातडीने १२० बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जास्तीत जास्त खाजगी रूग्णालयांनी कोवीड -१९ उपचार सेवा सुरू करावी अशी विनंती केली आहे. यासाठी विनंती अर्ज आल्यास त्या रूग्णालयाला व्यवस्था पाहून तातडीने मंजूरी देण्यास सांगितले आहे. एमआयटी संचलीत रूग्णालयात कोवीड सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. तेथुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी गरज पडल्यास आणखी बेड उपलब्ध करून घेण्याची आरोग्य विभागाने तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Displaying 4.jpg


तसेच, लातूर जिल्ह्यात आगामी काळात ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही. जिल्ह्यात ३० मेटन ऑक्सिजनची गरज असून जिल्ह्याची साठवण क्षमता ५४ मेटन आहे. ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर र्निबंध घातले असल्यामुळे या पूढे सुरळीत ऑक्सिजन पूरवठा होईल. जिल्ह्यात सध्या आवश्यकतेनुसार वेन्टिलेटरची उपलब्धता असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगीतले. रेमडेसीवीर औषधाच्या तुटवड्यावर उपाय म्हणून रेमडेसीवीर इंजेक्शनचा कधी वापर करावा यासाठी मार्गदर्शनक सुचना जारी केल्या आहेत. आयएमएलाही तशी मार्गदर्शक नियमावली तयार करण्यास सांगितली असून जिल्हाधिकाऱ्यांनी कोवीड – १९ हॉस्पिटलला मागणीनुसार या इंजेक्शनचा पुरवठा करावा अशा सुचनाही केल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच, रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला असला तरी त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होवू न देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. बाहेर देशातील लसींना देशात परवानगी दिल्यामुळे खाजगी क्षेत्रातुनही लसीकरण वाढणार आहे. त्यामुळे लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल अशी अपेक्षा पालमंत्री देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.