नवाब मलिकांना मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाकडून वैद्यकीय कारणासाठी २ महिन्यांचा जामीन मंजूर

मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक 23 फेब्रुवारी २०२२ पासून तुरुंगात 

नवी दिल्ली :-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर नवाब मलिक यांचा जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांसाठी मलिक यांचा जामिन मंजूर केला आहे. नवाब मलिक यांनी प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने मान्य केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी २०२२ पासून तुरुंगात आहेत.

२०२२ च्या फेब्रुवारी महिन्यापासून नवाब मलिक तुरुंगात होते. त्यांनी जवळपास दीड वर्षाचा काळ कारावासात घालवला. उच्च न्यायालयाने मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने कोणताही विरोध न झाल्याने त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

किडनी ट्रान्सप्लांटसाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. त्यावेळी ईडीकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. आता सु्प्रीम कोर्टात मात्र ईडीने कोणताही विरोध केला नाही. अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोप मलिक यांच्यावर करण्यात आले आहेत. याप्रकरणी ईडीकडून त्यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सध्या ते कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात अॅडमीट आहेत.