विरोधकांना यूपीएची लाज वाटते, काँग्रेसच्या काळात मणिपूरकडे दुर्लक्ष; श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी  भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी जोर लावला आहे. आपल्या आघाडीचे नाव बदलून त्यांनी ते यूपीए ऐवजी इंडिया  असेही केले आहे. या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजप नेत्यांनी टीकास्त्र उपसले. मोदींनी तर हे इंडिया नव्हे तर घमंडिया आहे, असा टोलाही लगावला. त्यानंतर आता मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. गेले बरेच दिवस हा प्रस्ताव चर्चेत असून यावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली. आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

श्रीकांत शिंदे म्हणाले, विरोधकांना यूपीएची लाज वाटते कारण त्यांना फक्त घोटाळे आठवतात. म्हणून त्यांनी इंडिया हे आघाडीचं नाव ठेवलं. काँग्रेसच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि दहशतवाद फोफावला होता. इंडिया विरोधकांची आघाडी नाही तर विनाशाची आघाडी आहे. अडला हरी गाढवाचे पाय धरी, अशी इंडियाती स्थिती आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सूची ए टू झेड वाचली तरी कमी पडेल.मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराची बाब देशासाठी अत्यंत चिंतेचा विषय असून या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. मात्र आज मणिपूर मुद्द्यावरून देशात राजकारण करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकाळात महाराष्ट्रात विविध ठिकाणी आतंकवादी हल्ले झाले, बॉम्बस्फोट झाले त्यावेळी कोणी मौन धारण केले होते ? असा सवाल आजच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठरावावर शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडताना उपस्थित केला.

मोदी सत्तेत आल्यानंतर मणिपूरचा विकास

सध्या संघर्षामुळे धुमसत असलेल्या मणिपूरच्या मुद्यावर देखील श्रीकांत शिंदे यांनी वक्तव्य केले. मणिपूरमध्ये जे होत आहे, तो चिंतेचा विषय आहे. यावर गंभीर कारवाई होण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील सर्व जनता एनडीए  सोबत आहे. काँग्रेसच्या काळात मणिपूरकडे लक्ष दिले गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मणिपूरचा विकास सुरू झाला. काँग्रेसच्या सत्ताकाळात मुंबई, पुणे, मालेगाव, हैद्राबादमध्ये बॉम्बस्फोट झाले. तेव्हा कोण गप्प होते, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला केला.

महाविकास आघाडीवर हल्लाबोल

श्रीकांत शिंदे म्हणाले, मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात केंद्राचे अनेक प्रकल्प रोखले गेले होते. कोरोना काळात तेव्हाचे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते. अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात जाऊन उद्धव ठाकरेंनी नवीन रेकॉर्ड केला, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. खुर्चीसाठी ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर देखील हल्लाबोल केला.

हनुमान चालीसेचे केले पठण

“महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हनुमान चालिसा पठण करण्यासाठीसुद्धा परवानगी दिली जात नव्हती.” असं ते बोलत असताना विरोधकांच्या बाकावर बसलेल्या कुणीतरी आवाज केला आणि शिंदे यांनी, ‘मला हनुमान चालिसा पूर्ण येते’ असं म्हणत हनुमान चालिसा पठणाला सुरूवात केली.