आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेसारख्या आधुनिक सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करावी-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारकडे केली मागणी


छत्रपती संभाजीनगर,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने आधुनिक सावकारी केली आणि शेतकऱ्यांच्या २१० कोटी रुपयांची लूट केली, अशा आधुनिक सावकारी करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सरकारकडे केली. 

   कागदपत्रांची कोणतीही योग्य प्रकारे पडताळणी न करता संभाजीनगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेने कर्जदारांना कर्ज वाटप केली. ज्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे २१० कोटी रुपये पतसंस्थेत अडकून राहिले.एक प्रकारे या बँकेने अशा पद्धतीने आधुनिक सावकारीच सुरू केली होती,असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. 

महाराष्ट्र सहकारी संस्था ( तिसरी सुधारणा) विधेयक – २०२३ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधान परिषद सभागृहात सादर केले. या विधेयकावर दानवे यांनी सहकार संस्थेचे विधेयक आणताना त्यात काही सूचना करत हे विधेयक कडक करण्यास म्हटले. 

  सदर पतसंस्थेने ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता,साक्षीदारांचा कुठला पुरावा न घेता तसेच अनेक ठिकाणी बँकेच्या मॅनेजरची स्वाक्षरी सुद्धा नसताना कर्ज वाटप केले. परिणामी ही बँक बुडीत निघाली ज्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे अडकून पडले आहेत. यावर आता सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.

अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या सहकारी पतसंस्था बँकांवरती नियंत्रण आणण्यासाठी सरकार काय उपयोजना करणार आहेत. तसेच ठेवी व ठेवीदारांच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सूचना दानवे यांनी सरकारला केल्या.