कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करणार  –उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी तपास सुरू असून रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभा सदस्य अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी केली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने मराठी माणसाला अभिमान वाटावे, असे व्यक्तिमत्व होते. अनेक राजकीय पक्षांना सुद्धा मोठ्या आयोजनात ते मदत करायचे. या हरहुन्नरी कलाकाराचे आपल्यातून निघून जाणे हे वेदनादायी आहे.

आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहेच. शिवाय त्यांना कुणी फसविण्याचा प्रयत्न केला का किंवा त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा कुणी प्रयत्न करीत होते का, याचाही तपास करण्यात येईल. हा स्टुडिओ जतन करण्याबाबत कायदेशीर मत घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

नितीन देसाईंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीप्समध्ये महत्त्वाची माहिती ?

ऑडिओ क्लीप्समुळे नितीन देसाईंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार 

खालापूर पोलिसांनी एन.डी. स्टुडिओतील नितीन देसाई यांचा मृतदेह खाली उतरवल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांना नितीन देसाई यांच्या मृतदेहाजवळ एक व्हॉईस रेकॉर्डर मिळाला होता. हा व्हॉईस रेकॉर्डरच नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीतील महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे. या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नितीन देसाई यांनी कुटुंबातील व्यक्तींबरोबरच आपल्या वकिलासाठी एक मेसेज रेकॉर्ड करुन ठेवला होता. व्हॉईस रेकॉर्डरमध्ये एकूण ११ ऑडिओ क्लीप्स आहेत. त्यापैकी एका ऑडिओ क्लीपमध्ये नितीन देसाई यांनी त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या गोष्टींविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे. ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ हे व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेले पहिले वाक्य आहे.यासोबतच नितीन देसाई(Nitin Desai) यांनी एका क्लीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत त्यांच्याकडे एक विनंती केली आहे. एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका. राज्य शासनाने या एनडी स्टुडिओचा ताबा घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य कलामंच उभारावं अशी माझी इच्छा आहे. मराठी, हिंदी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा. कारण एन.डी.स्टुडिओ हे नितिन देसाई म्हणून नाही तर एका मराठी माणसाने उभं केलेलं मोठं कलामंच आहे. आपण ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्याकडून फसवणूक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप नितीन देसाई यांनी केला. तसेच कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, यासाठी नितीन देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या मागण्यांसंदर्भात काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओबाबत अशोक चव्हाण यांची मोठा मागणी

मुंबई :-प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसला आहे. देसाई यांनी काल (२ ऑगस्ट) रोजी त्यांच्या कर्ज एथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. देसाई यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्याच सांगितलं जात आहे. यांसदर्भात आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधिमंडळात एनडी स्टुडिओ सरकारतर्फे टेकओव्हर करण्याची मागणी केली आहे.

राज्याच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येसंदर्भात चर्चा सुरु असताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओ सरकारने टेक ओव्हर करावा, अशी मागणी केली. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, देसाई यांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं ही बातमी खूप वाईट आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवली. त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये काही पुरावे दिले आहेत. त्यांच्यावर असलेल्या कर्जामुळे वसुलीसाठी त्यांच्यामागे लोक लागली होती, असं देखील त्यात आहे. या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी, असंही चव्हाण म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, शासनाने एनडी स्टुडिओ टेकओव्हर करावा. त्यावर कर्ज आहे. इतर लोकांनी लिलाव लावण्यापेक्षा तो स्टुडिओ सरकारने घ्यायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. चव्हाण यांनी केलेल्या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठी माणसाला अभिमान वाटावा असं काम देसाई यांनी केलं होतं. अनेक ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रोक्टवर काम केलं. दिल्लीतील चित्ररथ नेहमी तेच करायचे. हरहुन्नरी कलावंत आपल्याला सोडून गेले. त्यांच्यावर काही कर्ज झालं होतं ही गोष्ट खरी आहे. या संदर्भात चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर कोणता दबाव होता का याची चौकशी करण्यात येईल. कायदेशीर बाबी तपासून नितीन देसाई यांची आठवण म्हणून हा स्टुडिओ आपल्याला तसाच ठेवून त्याचं संवर्धन करता येईल का? या कायदेशीर बाबी तपासण्यात येतील, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.