सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होणार

राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांसाठी राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना मिळणार असून यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २,४१८ संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत. अशा प्रकारे मोफत उपचार मिळावेत यासाठी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार आरोग्याचा हक्काचा अधिकार नागरिकांना देण्यात आला आहे.

यानुसार, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक आणि अमरावती, कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत. सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात २.५५ कोटी नागरिक उपचारांसाठी येतात.